Fri, Apr 26, 2019 17:56होमपेज › Ahamadnagar › आमदार संग्राम जगतापांसह चौघांना पोलिस कोठडी

आमदार संग्राम जगतापांसह चौघांना पोलिस कोठडी

Published On: Apr 09 2018 1:32AM | Last Updated: Apr 09 2018 1:32AMनगर : प्रतिनिधी

केडगाव येथे शिवसेना कार्यकर्त्यांचा खून केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांना शनिवारी रात्री चौकशीसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात आणले होते. त्यानंतर जगताप समर्थकांनी कार्यालयावर हल्ला, तोडफोड करून स्थानिक गुन्हे शाखेतून आ. जगताप यांना पळवून नेले. पोलिसांनी जमावातील काहींची धरपकड करून 22 जणांना अटक केली. पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ल्यानंतर तणाव निर्माण झाल्याने पहाटे आ. संग्राम जगताप हे पोलिसांना शरण आले. गोळीबार व खूनप्रकरणी अटक केलेल्या आ. जगताप यांच्यासह चौघांना गुरुवारपर्यंत (दि. 12) व पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणार्‍या 22 जणांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, केडगाव येथील खून प्रकरणाच्या फिर्यादीत आ. संग्राम जगताप यांच्या नावाचा उल्लेख असल्याने पोलिसांनी त्यांना पोलिस अधीक्षक इमारतीतील स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी आणले होते. तेथे सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांच्यासह पोलिस जगताप त्यांची चौकशी करीत होते. 

दरम्यान, जगताप यांना पोलिस अधीक्षक कार्यालयात नेताच, त्यांना अटक केल्याची चर्चा पसरू लागल्याने त्यांच्या समर्थकांचा मोठा जमाव एसपी कार्यालयात गोळा झाला. तो जमाव आ. संग्राम जगताप यांना सोडून द्या, अशा जोराच्या घोषणा देत होता. त्यावेळी आ. शिवाजी कर्डिले, माजी आ. दादाभाऊ कळमकर आदींसह जमाव आतमध्ये घुसत होता. गार्ड ड्युटीवरील महिला कर्मचारी त्यांना अडविण्याचा प्रयत्न करीत होत्या. हा आवाज ऐकून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आले. त्यांनी जमावाला आत घुसू देण्यापासून रोखले.

जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडफेक करून लाकडी दांडके व हाताने दरवाजाच्या काचा फोडल्या. त्यानंतर जमाव आतमध्ये घुसला. जमावातील एकाने लाकडी दांडके पोलिस कर्मचारी संदीप घोडके यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दांडके हुकविल्याने ते त्यांच्या खांद्याला लागले. पोलिस अधिकारी, कर्मचारी व महिला पोलिसांना धक्काबुक्की करून जमाव तोडफोड करून आतमध्ये घुसला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या कक्षात घुसून तेथे चौकशीसाठी आणलेल्या आ. जगताप यांना जमावाने उचलून घेऊन गेले. हा गोंधळ सुरू असताना पोलिसांनी जमावातील तब्बल 22 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

तोडफोडीमुळे पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोर्चमध्ये काचा अस्ताव्यस्त पडल्या होत्या. पोलिसांची अतिरिक्त कुमक आल्यानंतर जमाव पांगविण्यात आला. पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा हे केडगावहून तातडीने पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे आले. पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला झाल्यानंतर शहरात काहीसा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पहाटेच्या सुमारास आ. संग्राम जगताप हे स्वतःहून पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर झाले. काही वेळानंतर केडगाव खून प्रकरणात बाळासाहेब कोतकर, बी. एम. कोतकर यांनाही ताब्यात घेण्यात आले. 

मध्यरात्रीच्या सुमारास नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनय चौबे नगरला दाखल झाले. राज्याचे अपर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी हे सकाळी नगरला पोहोचले. या घटनेमुळे केडगावससह नगर शहरात काहीशी तणावसदृश परिस्थिती आहे. नागरिकांनी कडकडीत बंद पाळून संपूर्ण व्यवहार बंद ठेवले होते. पर्यावरणमंत्री रामदास कदम, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, ना दिवाकर रावते आदींनी नगरला धाव घेतली. शहर व परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर हत्या झालेले संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्यावर काल (दि.8) सायंकाळी केडगाव येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. 

केडगाव येथील खून प्रकरणात अटक केलेल्यांमध्ये राष्ट्रवादीचे आ. संग्राम अरुण जगताप (रा. भवानीनगर, नगर), बाळासाहेब एकनाथ कोतकर (रा. एकनाथनगर, केडगाव), भानुदास महादेव कोतकर ऊर्फ बी.एम. (रा. केडगाव), संदीप रायचंद गुंजाळ उर्फ डोळसे (रा. नेप्तीरोड, केडगाव) यांचा समावेश आहे. अटक केलेल्यांना दुपारी न्या. एस. पी. नलगे-केस्तीकर यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. तपासी अधिकारी अभय परमार व सरकारी वकील अ‍ॅड. क्रांती कुलकर्णी यांनी गुन्ह्याच्या सखोल तपास करणे, कोयता, तलवार ही शस्त्रे हस्तगत करणे, कटात कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने आरोपींना गुरुवारपर्यंत (दि. 12) पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिस अधीक्षक कार्यालयात धुडगूस घालून चौकशीसाठी आणलेल्यांना पळवून नेल्याप्रकरणी कैलास रामभाऊ गिरवले (रा. अमन पाटील रस्ता, माळीवाडा), अ‍ॅड. प्रसन्न मनोहर जोशी (रा. कराचीवाला नगर, तारकपूर बसस्थानक), अ‍ॅड. संजय मधुकर वाल्हेकर, शरिफ राजू शेख (रा. कपाट कारखान्याजवळ, रामवाडी), राहुल अरुण चिंतामण (रा. फकीरवाडा, गाडेचाळ), अशिंद अकबर सय्यद (रा. राजकोटजवळ, मुकुंदनगर), आवेश जब्बार शेख (रा. दगडीचाळ, मुकुंदनगर), जाएद आसिफ सय्यद (रा. संजोगनगर, मुकुंदनगर), सागर मच्छिंद्र वाव्हळ (रा. अरणगाव रस्ता, कायनेटीक कंपनीजवळ), अनिल रमेश राऊत (रा. पाईपलाईन हडको, सावेडी), अनिकेत बाळासाहेब चव्हाण (रा. दातरंगे मळा, दत्तनगर), गिरीष सुभाषराव गायकवाड (रा. बागरोजा हडको, दिल्ली दरवाजाजवळ),

दीपक रामचंद्र गाडीलकर (रा. बोरुडेगल्ली, नालेगाव), रियाज रमजान तांबोळी (रा. धरतीचौक, हातमपुरा), दत्ता सखाराम उगले (रा. भाजीमार्केट, भवानीगर), कुणाल सुभाष घोलप (रा. भांबळगल्ली, बुरुडगाव रस्ता), साईनाथ यादव लोखंडे (रा. नक्षत्र लॉनजवळ, बुरुडगाव रस्ता), सचिन रामदास गवळी (रा. दरेवाडी), सोमनाथ भाऊसाहेब गाडेकर (रा. मार्केट यार्डमागे, भवानीनगर), संतोष लहानू सूर्यवंशी (रा. मार्केटयार्ड, भवानीनगर), धर्मा त्रिंबक करांडे (रा. महात्मा फुले चौक, मार्केट यार्ड), इम्रान जानसाहब शेख (रा. बडी मशीदजवळ, दरबार कॉलनी, मुकुंदनगर) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना काल (दि. 8) दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पुढील चौकशीसाठी मंगळवारपर्यंत (दि. 10) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. 

साडेसात तास मृतदेह घटनास्थळीच!

शनिवारी सायंकाळी सहा वाजता संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाली. आ. जगताप पिता-पुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यासाठी नागरिकांनी रास्ता-रोको आंदोलन सुरू केले. मृतदेह ताब्यात घेण्यास पोलिसांना त्यांनी मज्जाव केला. रात्री उशिरा पोलिसांना घटनास्थळ पंचनामा व इतर कायदेशीर कार्यवाही करून देण्याची तयारी दर्शविली. सर्व प्रक्रिया पूर्ण करून मध्यरात्री दीड वाजता मृतदेह घटनास्थळावरून उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.

 

Tags : Ahmednagar, Ahmednagar news, crime, Shivsena officebearers murder, Sangram Jagtap, Police custody,