Fri, Jul 19, 2019 18:44होमपेज › Ahamadnagar › पोलिसांच्या कोठड्या रिकाम्या

पोलिसांच्या कोठड्या रिकाम्या

Published On: May 07 2018 2:00AM | Last Updated: May 07 2018 12:07AMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांड, पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरण, पोलिसांवरील दगडफेक प्रकरणातील अनेक आरोपी अजूनही फरार आहेत. त्यांचे अटकसत्र थंडावले आहे. दगडफेक प्रकरणात राजकीय दबावापोटी भादंवि कलम 308 मागे घेण्यात आल्यापासून पोलिस निरुत्साही झाल्याची चर्चा सुरू आहे. केडगाव हत्याकांडांतर दाखल झालेल्या तीन गुन्ह्यांतील ‘आरोपी हजार कोठड्यांची मारामार’, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता ‘पोलिस कोठड्या झाल्या रिकाम्या’, अशी म्हणण्याची वेळ आल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

केडगाव दुहेरी हत्याकांडात राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप, नगरसेवक विशाल कोतकर यांच्यासह एकूण 9 जणांना अटक करण्यात आलेली आहे. ते सर्व आरोपी आता न्यायालयीन कोठडीत आहेत. पोलिस कोठडीतो आता एकही आरोपी उरलेला नाही. या गुन्ह्याच्या फिर्यादीतील अनेक जण अजूनही फरार आहेत. त्यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यांचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झालेला नसल्याने अटक होत नसल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. परंतु, खुनापूर्वी सुनेशी भानुदास कोतकर याचे संभाषण झालेले होते. त्यांच्यातील संभाषण नेमके काय होते, याची चौकशी करण्यासाठी पोलिसांकडून कोतकर याचा शोध सुरू आहे. 

पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणात 44 जणांना अटक करण्यात आलेली आहे. नावे निष्पन्न झालेले अनेकजण अजून फरार आहेत. अटक केलेले सर्व जण जामिनावर बाहेर आलेले आहेत. एकाच गटातील आरोपींना अटक करणे योग्य आहे का, असा प्रश्‍न पोलिसांच्या मनात पडला असेल. मात्र, कायदेशीर कार्यवाही म्हणून नावे निष्पन्न झालेल्या फरार आरोपींना अटक करावी लागेल. 

केडगाव येथील दगडफेक प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतरही वरिष्ठांच्या दबावापोटी पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नव्हती. आता तर त्यातील भारतीय दंड विधानाचे कलम 308 मागे घेण्यात आलेले आहे. परंतु, इतर कलमान्वये गुन्ह्याची नोंद आहे. आरोपींनी अटकपूर्व जामीन घेतलेला नसतानाही त्यांना अटक केली जात नाही. ते बिनधास्तपणे शहरात फिरत आहेत. केडगाव हत्याकांडात निर्माण झालेल्या कायदा-सुव्यवस्थेच्या घटनांबाबत पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांतील अनेक आरोपी अजून फरार असून, त्यांच्या अटकेची कारवाई थंडावली आहेत. त्यामुळे शहरातील पोलिस कोठड्या झाल्या रिकाम्या, अशी उपरोधिक चर्चा सोशल मीडियातून होऊ लागली आहे.