Wed, Mar 27, 2019 06:00होमपेज › Ahamadnagar › पोलिस हवालदारांनी मागितली खंडणी! 

पोलिस हवालदारांनी मागितली खंडणी! 

Published On: Feb 07 2018 1:35AM | Last Updated: Feb 06 2018 11:21PMशेवगाव : प्रतिनिधी

वाळूची वाहतूक करीत नसताना शेतकर्‍याचा ट्रॅक्टर अडवून खंडणीची मागणी करणार्‍या; तसेच मध्यस्थी करणार्‍यास गावठी कट्टा दाखवून जिवे मारण्याची धमकी देणार्‍या दोन पोलिस हवालदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही पोलिस फरार झाले असून, या प्रकाराने शेवगाव पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर आली आहे.

चापडगाव येथील शेतकरी अशोक गाडे हे दिवसभर शेताची मेहनत करून सायंकाळी आनंद पातकळ या मित्रासमवेत ट्रॅक्टर घेऊन घरी जात होते. त्यावेळी चापडगाव-बोधेगाव रस्त्यावर कल्याण गाडे व अंकुश दहिफळे या दोन पोलिस हवालदारांनी आपली कार आडवी लावून हा ट्रॅक्टर अडवला. कारमधून खाली उतरून, हे दोघे अशोक गाडे यांच्याकडे ‘तू वाळू वाहतूक करतो. तुझा ट्रॅॅक्टर पोलिस ठाण्यात घेऊन चल. नाहीतर 5 हजार रुपये दे’, अशी मागणी करू लागले. परंतु, अशोक गाडे यांनी आपण वाळू वाहतूक करीत नाही. 

त्यामुळे पैसे देणार नाही, असे त्यांना सांगितले. त्यानंतर अशोक गाडे यांनी शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष नवनाथ ईसरवाडे (रा. गदेवाडी) यांना मोबाईलवरून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी हा मोबाईल घेऊन ईसरवाडे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर काही वेळातच ईसरवाडे हे घटनास्थळी गेले. त्यावेळी कल्याण गाडे या पोलिस हवालदाराने त्यांना गावठी पिस्तूल दाखवून, ‘तू जर येथे थांबला तर, तुला मारुन टाकीन’, अशी धमकी दिली.

याप्रकरणी अशोक गाडे (रा.चापडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात हवालदार कल्याण गाडे व अंकुश दहिफळे यांच्याविरूद्ध रस्ता अडविणे, खंडणीसाठी धमकावणे, आर्म अ‍ॅक्ट आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हे दोघे फरार झाले आहेत. दरम्यान, या प्रकाराने चांगलीच खळबळ उडाली असून, पोलिसही गुन्हेगारांसारखे गावठी कट्टे वापरत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या पोलिसांवर काय कारवाई होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.