होमपेज › Ahamadnagar › पोकलेनचे ब्रेकर चोरणारी टोळी जेरबंद

पोकलेनचे ब्रेकर चोरणारी टोळी जेरबंद

Published On: Aug 01 2018 1:46AM | Last Updated: Aug 01 2018 1:44AMनगर : प्रतिनिधी

पोकलेनचे ब्रेकर चोरणारी चौघांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने काल (दि. 31) तळेगाव दाभाडे शिवारातून जेरबंद केली. त्यांच्याकडून चोरलेले ब्रेकर व गुन्ह्यात वापरलेली वाहने असा एकूण 14 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. इतर तीन आरोपी फरार असून, पोलिस त्यांच्या शोधात आहेत. 

अटक केलेल्यांमध्ये विष्णू ऊर्फ विठू नरहरी समुकराव (वय 29, रा. वराळेफाटा, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे), अरुण जगदीश साव (वय 20, रा. आखियाँ, ता. लातेहर, जि. बालुमत रांची, झारखंड, हल्ली रा. सोमटणे फाटा, तळेगाव दाभाडे), प्रवीण बाळासाहेब भेगडे (वय 32, रा. वराळे रोड, तळेगाव दाभाडे), शशिकांत लहानू सुपे (वय 27, रा. समता कॉलनी, वराळे रोड, तळेगाव दाभाडे) यांचा समावेश आहे. सुदीप किशोर साव (रा. झारखंड), प्रमोद कुमार यादव (रा. झारखंड) व नवले (पूर्ण नाव माहीत नाही, रा. वांबोरी) हे तीन जण फरार आहेत. 

इसळक येथील गेरंगे गॅरेज येथून गोविंद बुधाजी शिंदे (रा. वडगाव गुप्ता) यांच्या मालकीच्या पोकलेनचे ब्रेकर सुदीप साव व प्रमोद यादव या दोघांनी चोरून नेले होते. तसा गुन्हा एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही चोरी करणारी टोळी तळेगाव दाभाडे येथे आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यावरून पोलिस उपनिरीक्षक राजकुमार हिंगोले, सहाय्यक फौजदार नाणेकर, कर्मचारी मन्सूर सय्यद, योगेश गोसावी, रवींद्र कर्डिले, दीपक शिंदे आदींच्या पथकाने सापळा रचून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरलेले पोकलेनचे ब्रेकर, गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार, पिकअप असा एकूण 14 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींना पुढील चौकशीसाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.