Sun, May 26, 2019 16:40होमपेज › Ahamadnagar › ..अन् त्यांनीच बजावली नोटीस

..अन् त्यांनीच बजावली नोटीस

Published On: Dec 04 2017 1:39AM | Last Updated: Dec 03 2017 11:01PM

बुकमार्क करा

पाथर्डी : शहर प्रतिनिधी

तालुक्यातील मिरी येथील पोकलेन प्रकरणातील मुद्देमाल चौकशी प्रकरणी तक्रारदार आम आदमी संघटनेचे संयोजक किसन आव्हाड यांना आंदोलन करू नये म्हणून पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची नोटीस बजावली आहे. दरम्यान, ज्यांच्या विरोधात तक्रार आहे त्यांनीच आंदोलन न करण्यासाठी नोटीस बजावल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

तालुक्यातील मिरी येथे जुलै महिन्यात पुण्यातील (वाळुंज) येथील गोविंद इंगळे यांची स्वस्तात पोकलेन देतो, म्हणून 12 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. घटनेच्या दुसर्‍याच दिवशी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणातील एका महिलेला व दोन अल्पवयीन मुलांना पकडून रोख 3 लाख रुपये व एक मोबाईल हस्तगत करून पाथर्डीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्या ताब्यात मुद्देमाल देण्यात आला होता. यावेळी मुद्देमालाचे चित्रीकरण देखील करण्यात आले होते. गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक पुंडलिक पावसे यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

मात्र, दोषारोप पत्रात रोख 3 लाख रुपये दाखविण्याऐवजी केवळ 1 लाख 9 हजार रुपये दाखवण्यात आले होते. त्यामुळे उर्वरित 1 लाख 91 हजार रुपये नेमके कोणाच्या खिशात गेले, याची चर्चा शहरात जोरदार झाली. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे संयोजक किसन आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.  या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून हालचाल होताच पाथर्डीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी आंदोलन न करण्यासाठी किसन आव्हाड यांना नोटीस दिली. आंदोलन केल्यास कलम 148 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची नोटीस बजावली आहे. दरम्यान, ज्यांच्या विरोधात तक्रार आहे, त्यांनीच नोटीस बजावल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

न्यायालयात दाद मागणार

याप्रकरणात माझी तक्रार पोलिस निरीक्षक व तपासी अधिकार्‍यांविरोधात आहे. त्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मी केली आहे. मात्र आंदोलन न करण्यासाठी ज्यांच्या विरोधात माझी तक्रार आहे, त्यांनीच प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची नोटीस बजावणे हे कितपत न्याय्य आहे? प्रशासनाकडून आंदोलन दडपण्याचे काम चालू आहे. या प्रकरणी लवकरच आपण उच्च न्यायालयात गुन्हे दाखल करण्यासाठी याचिका दाखल करणार आहोत, असे किसन आव्हाड यांनी सांगितले.