Thu, Apr 25, 2019 07:32होमपेज › Ahamadnagar › प्रत्येक गावात अकराशे वृक्षांची लागवड

प्रत्येक गावात अकराशे वृक्षांची लागवड

Published On: Jul 03 2018 1:50AM | Last Updated: Jul 02 2018 11:44PMवळण : वार्ताहर

1 ते 11 जुलै दरम्यान राज्यभर 13 कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम शासनाने हाती घेतला आहे. त्यानुसार राहुरी तालुक्याला 89 हजार 462 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. तालुक्यातील एकूण 82 ग्रामपंचायत मार्फत प्रत्येक गावात 1100 वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम गावपातळीवर वृक्षदिंडी आणि विविध उपक्रम राबवून 1 जुलै रोजी प्रारंभ करण्यात येणार होता. परंतु रविवारी सुट्टी असल्याने हा कार्यक्रम काल सोमवारी प्रत्येक ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय, शासकीय, निमशासकीय कार्यालय स्थळी करण्यात आला.

पर्यावरणाचा दिवसेंदिवस होणारा र्‍हास, त्यामुळे वाढते तापमान, घटलेले पर्जमान्य याचा मानवी जीवनावर परिणाम होत आहे. भविष्यातील आणखी मोठे संकट ओळखून शासन प्रतिवर्षी वृक्षलागवड व संवर्धन हा उपक्रम पावसाळ्यापूर्वी राबवत असते. परंतु केवळ फोटोशेसन होऊन कोठेही पुढेही वृक्ष जोपासली गेलेली पहावयास मिळत नाही. पुन्हा पुढील वृक्षारोपन त्याच खड्ड्यात आणि तेच पदाधिकारी, अधिकारी यांच्या हस्ते होते, ही शोकांतिका आहे. जोपर्यंत ही आमची गरज होत नाही, तशी भावना, निर्माण करण्यात राजकर्ते, जबाबदार व्यक्ती यशस्वी होणार नाही तोपर्यंत शासनाची कोणतीही योजना, उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही, हे अनेक उपक्रम, योजनेतून सर्वांना पहावयास मिळत आहे. तशीच अवस्था या 13 कोटी वृक्ष लागवड व संवर्धनाचे होऊ नये म्हणून शासनाने कृषी विभागामार्फत ही योजना यशस्वी व्हावी यासाठी जोरदार तयारी केलेली आहे.

राहुरी तालुक्यातील एकूण 82 ग्रामपंचायतीमार्फत प्रत्येक गावात 1100 याप्रमाणे वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. गावठाणतंर्गत असणारी मोकळी जागा, स्मशानभूमी, शाळा, महाविद्यालय परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर आदी ठिकाणी वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी त्या त्या विभागातील नागरिक, कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी यांनी घेतल्यास यंदाची ही मोहीम खर्‍या अर्थाने यशस्वी होऊ शकते.

प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाड्या,  सार्वजनिक ठिकाण, सर्व शासकीय संस्था आदींच्या हद्दीत व परिसरात ही वृक्षलागवड करून त्याचे संवर्धन करावयाचे आहे. त्यानुसार तालुक्यातील सर्व गावांना उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.पंचायत समिती, कृषी विभाग, सामाजिक वनीकरण आणि वन विभाग यांच्याकडून वृक्ष उपलब्ध करणार आहे. ही वृक्षे राहुरी तालुक्यातील पिंप्री अवघड व डिग्रस येथील नर्सरीतून आवळा, लिंब, वड, चिंच, सुबाभूळ आदी वृक्षांची रोपे उपलब्ध करुन देणार आहे. पण ती मोफत की विकत देणार ? याबाबत अद्यापतरी स्पष्ट संकेत नाहीत.