Mon, Nov 18, 2019 21:24होमपेज › Ahamadnagar › झाडे लावा.. क्‍वार्टर फ्री मिळवा

झाडे लावा.. क्‍वार्टर फ्री मिळवा

Published On: Jul 12 2019 1:42AM | Last Updated: Jul 12 2019 12:16AM
नगर : प्रतिनिधी
शासनाच्या वृक्ष लागवड व संवर्धनासाठी सुरू असलेल्या अभियानाची खिल्ली उडविणारा व गंमत म्हणून सोशल मीडियात पोस्ट टाकून राबविलेला ‘नशेबाज फंडा’, मनपा अधिकार्‍याच्या चांगलाच अंगलट आला आहे. आयुक्‍तांनी याची गंभीर दखल घेत ‘झाडे लावा.. क्वार्टर फ्री मिळवा’ अशा आशयाची पोस्ट टाकणार्‍या स्वच्छता निरीक्षक के. के. देशमुख यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर ही पोस्ट टाकण्यात आली होती. ‘सर्व मुकादमांना सुवर्णसंधी.. पावसाळ्यात झाड लावा व वाढवा आणि हिवाळ्यात क्वार्टर फ्री मिळवा.. झाडे लावा क्वार्टर मिळवा, संधीचा लाभ घ्यावा’, असा संदेश संबंधित अधिकार्‍याने मुकादमांना उद्देशून पोस्ट केला आहे. या पोस्टमुळे सोशल मीडियात महापालिकेची बदनामी सुरू झाल्यानंतर, मनपा आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. उपायुक्त पठारे यांनी देशमुख यांच्या निलंबनाचे आदेश पारित केले आहेत.

के. के. देशमुख यांनी लेखी खुलासा करताना ‘क्वार्टर’चा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचा दावा केला आहे. गंमत म्हणून ही पोस्ट टाकली होती. संस्थेची बदनामी नको, म्हणून माफीही मागितली आहे. मात्र, मनपा कामगार युनियनचे अध्यक्ष व इतर पदाधिकार्‍यांनी मला टार्गेट करून वैयक्तिक द्वेषातून प्रशासानावर दबाव टाकला व माझी बदनामी केली, असा आरोपही त्यांनी केला आहे.