Wed, Jul 17, 2019 18:05होमपेज › Ahamadnagar › बांधा-बांधावर जाऊन घोंगडी बैठका घ्या

बांधा-बांधावर जाऊन घोंगडी बैठका घ्या

Published On: Apr 07 2018 1:41AM | Last Updated: Apr 07 2018 12:35AMसंगमनेर : प्रतिनिधी

चुकीचे बियाणे व औषधे यांच्या वापरामुळे महाराष्ट्रात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. मात्र, शेजारील कोणत्याही राज्यात हा प्रादूर्भाव झाला नाही. कीटकनाशकांबाबत सुरक्षितता, जास्त उत्पादन व शासकीय योजनांची माहिती कृषी विभागाने शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन द्यावी, म्हणजे शेतकर्‍यांना मोठी मदत होईल, असे प्रतिपादन माजी कृषिमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले. प्रांताधिकारी कार्यालयातील सभागृहात कृषी विभागाच्यावतीने आयोजित खरीप आढावा पूर्व नियोजन बैठकीत ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आ. डॉ.सुधीर तांबे, जि. प. कृषी संवर्धन सभापती अजय फटांगरे, सभापती निशाताई कोकणे, इंद्रजित थोरात, उपसभापती नवनाथ आरगडे, जि. प सदस्य भाऊसाहेब कुटे, रामहरी कातोरे, उपविभागीय अधिकारी भागवत डोईफोडे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमांडे, कृषी अधिकारी कारभारी नवले, तहसीलदार साहेबराव सोनवणे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले की, बनावट बियाणे व कीटकनाशके यामुळे राज्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शेजारी गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यांत हा प्रादुर्भाव नव्हता. खरे तर कृषी विभाग व विद्यापीठे स्तब्ध झाली आहेत. सरकारच्या विविध योजना समजावून सांगण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी त्यांच्या शेतावर जाऊन घोंगडी बैठका घ्या, शिवार फेर्‍या करा, त्यांना जास्तीत जास्त माहिती द्या.

आगामी काळात शेतकर्‍यांना वेळेत बी-बियाणे, खते मिळतील, यासाठी नियोजन करा. खरे तर राज्यपातळीवर पुन्हा खरीप आढावा बैठका सुरू झाल्या पाहिजेत, यामुळे सरकारला शेतकर्‍यांच्या अडचणी कळतील. पीकविमा शेतकर्‍यांच्या मोठ्या मदतीचा असून त्याबाबत जास्तीत जास्त जागृती करा, कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांनी विविध सांकेतिकस्थळांवरुन पावसाचे अंदाज घेऊन शेतकर्‍यांना कळवावेत. जलयुक्त शिवार योजनेच्या मोठ्या गाजावाजाबद्दल नाराजी व्यक्त करीत शेततळी, कांदाचाळ, कृषी औषधे याबाबत सूचनाही त्यांनी केल्या.

आ. डॉ. तांबे म्हणाले, कीटकनाशकांमुळे शेतकर्‍यांचा मृत्यू होणे, हे अत्यंत दुर्देवी आहे. विषारी औषधे वापरण्याची पद्धती याबाबतच्या उपाययोजना याची अधिक माहिती कृषी विभागाने शेतकर्‍यांपर्यत पोहोचविली पाहिजे. यासाठी कृषी कर्मचार्‍यांनी अधिक माहिती घेऊन शेतकर्‍यांना प्रात्याक्षिकांसह माहिती द्यावी.

यावेळी जि.प.कृषी समिती सभापती अजय फटांगरे यांनी जि.प माध्यमातून शेतकर्‍यांसाठी सुरू असलेल्या विविध शासकीय योजनांसाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे सांगितले. यावेळी कृषी अधिकारी कारभारी नवले यांनी कृषी विभागाच्या विविध योजना तसेच खते, बी-बियाणे याबाबतची सविस्तर माहिती दिली. प्रास्ताविक बाळासाहेब मुसमाडे यांनी केले. 
 

Tags : Sangamner, Sangamner news, kharif review, Planning