Wed, Nov 21, 2018 05:12



होमपेज › Ahamadnagar › सदस्यपद न सोडल्याने सरपंचपद गमावण्याची वेळ

सदस्यपद न सोडल्याने सरपंचपद गमावण्याची वेळ

Published On: Jun 14 2018 1:33AM | Last Updated: Jun 14 2018 1:33AM



नगर : प्रतिनिधी

तालुक्यातील पिंपळगाव लांडगा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदाबरोबरच सदस्यपदी शकुंतला चंद्रभान पवार विजयी झाल्या. परंतु त्यांनी दोन्हीपैकी एका पदाचा राजीनामा वेळेत सादर केला नसल्याने, त्यांना दोन्ही पदे गमवावी लागली आहेत. या दोन्ही रिक्‍त पदाची लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. 

पिंपळगाव लांडगा या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 2017 रोजी घेण्यात आली. सरपंचपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव होते. या पदासाठी शकुंतला पवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. परंतु त्यांनी अर्जाबरोबर जातप्रमाणपत्र जोडले नव्हते. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सात सदस्यपदासाठीच निवडणूक झाली. राज्य निवडणूक आयोगाने 16 फेब्रुवारी 2018 रोजी या ग्रामपंचायतीच्या सरपंच तसेच एका सदस्यपदाच्या रिक्‍त जागेची पोटनिवडणूक घेतली. या निवडणुकीत शकुंतला पवार सरपंचपदाबरोबरच सदस्यपदी देखील निवडून आल्या. सात दिवसांच्या आत दोन्हीपैकी एका पदाचा राजीनामा देणे बंधनकारक आहे. परंतु पवार यांनी काही दोन्हीपैकी एका पदाचा राजीनामा वेळेत सादर केला नाही. 

याबाबत उपसरपंच योगेश लांडगे यांनी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्याकडे 5 मे 2018 रोजी तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी दोन सुनावण्या घेतल्या. या सुनावणीचा अंतिम निकाल 12 जून 2018 रोजी जाहीर झाला. शकुंतला पवार यांनी वेळेत  दोन्ही पदापैकी एका पदाचा राजीनामा दिला नाही, हे सिध्द झाले. त्यामुळे पवार या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सदस्य व सरपंच यापैकी एकाही पदावर निवडून आलेल्या नाहीत.त्यामुळे हे दोन्ही पदे रिकामे झाल्याचे जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी निकालाव्दारे घोषित केले आहे.