Tue, Apr 23, 2019 18:15होमपेज › Ahamadnagar › वन्यजीवांकडून होणार्‍या नुकसानीबाबत याचिका

वन्यजीवांकडून होणार्‍या नुकसानीबाबत याचिका

Published On: Aug 06 2018 1:51AM | Last Updated: Aug 06 2018 1:51AMनेवासा : प्रतिनिधी 

वन्यप्राण्यांकडून होणार्‍या पिकांच्या नासाडीची नुकसान भरपाई देण्याची तरतूद शासन करत नसेल तर जनहित याचिका दाखल करुन शेतकर्‍यांना न्याय मिळवून देता येईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी चेअरमन व प्रसिद्ध विधिज्ञ व्ही. डी. साळुंके यांनी केले.

नेवासा तालुका वकील संघाने आयोजित केलेल्या ज्येष्ठ विधिज्ञांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर न्या. बी. यू. चौधरी, न्या. एम. वाय.डोईफोडे, न्या. ए. बी. निवारे, न्या. पी. व्ही. राऊत, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. वसंतराव नवले, अ‍ॅड. एस. एस. साळवी, अ‍ॅड. देसाई देशमुख, अ‍ॅड. एम. आय.पठाण, अ‍ॅड. बी. एस. काळे, अ‍ॅड. एस. डी. लोंढे उपस्थित होते. प्रास्ताविक अ‍ॅड. वसंत नवले यांनी केले. ते म्हणाले की नेवासा वकील संघाला जुनी परंपरा आहे. नामवंत वकील सेवा करीत आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आमचे कर्तव्य आहे. 

यावेळी अ‍ॅड. देसाई देशमुख, अ‍ॅड. एम. बी. कुलकर्णी, अ‍ॅड. एम. आय.पठाण, अ‍ॅड. एस. एस. साळवी, अ‍ॅड. पी. व्ही. माकोणे, अ‍ॅड. एस. डी. लोंढे, अ‍ॅड. एस. एस. पठाण, अ‍ॅड. एस. पी. दरंदले या ज्येष्ठ सदस्यांचा अ‍ॅड. व्ही.डी. साळुंके यांचे हस्ते गौरव करण्यात आला. 

साळुंके म्हणाले की, वकिलीमध्ये ज्येष्ठ सदस्य हे वकिलांचे गुरू असतात.न्यायालयीन कामकाज करताना न्यायाधिकार्‍यांकडून वकिलांना अपमानास्पद वागणूक मिळू नये, म्हणून बार कौन्सिल दखल घेते. जनहित याचिका दाखल करण्यासाठी आता मोठे निर्बंध आले आहेत. याचिकांचा दुरुपयोग होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची पाच प्रतिज्ञापत्रे दाखल करावी लागतात. वन्य प्राण्यांकडून शेतमालाची नासाडी होते.

आधीच शेती बिनभरवश्याचा व्यवसाय आहे. त्यात निम्मी पिके हरणे, रानडुकरे, वनगाई यांनी खाल्ली तर शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळण्याची काही सोय नाही. अशा परिस्थितीत पुरेसे पुरावे उपलब्ध करून दिल्यास मी स्वतः जनहित याचिकेद्वारे तसा कायदा करायला भाग पाडील. वाघामुळे झालेल्या केळीच्या बागांची नुकसान भरपाई मिळू शकते तर इतर बाबतीत का नाही? असा सवाल त्यांनी केला.सूत्रसंचालन अ‍ॅड. दिलीप चंगेडिया यांनी केले. आभार उपाध्यक्ष अ‍ॅड. गोकुळ भताने यांनी मानले.