Mon, Apr 22, 2019 04:21होमपेज › Ahamadnagar › सीना पात्रातील पोकलनची नासधूस!

सीना पात्रातील पोकलनची नासधूस!

Published On: Jun 06 2018 1:41AM | Last Updated: Jun 05 2018 11:43PMनगर : प्रतिनिधी

सीना पात्राचे रुंदीकरण व खोलीकरणासाठी सुुरु असलेल्या ‘मिशन सीना’ मोहिमेत आडकाठी आणण्याच्या उद्देशातून कारवाईसाठी नियुक्‍त असलेल्या पोकलॅन मशिनची नासधूस करण्याचा प्रकार काल (दि.5) सकाळी उघडकीस आला आहे. सोमवारी (दि.4) रात्रीतून हा प्रकार घडल्याचे व या संदर्भात जिल्हाधिकारी राहुले द्विवेदी यांनी गंभीर दखल घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती अतिक्रमण निर्मुलन विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी दिली.

नदी पात्रातील भराव व अतिक्रमणे हटवून पात्र मोकळे करण्याचे काम गेल्या आठवडाभरापासून सुरु आहे. त्यासाठी सुमारे सहा पोकलॅन मशिन व 25 ते 30 डंपर कारवाईसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. सायंकाळी कारवाई थांबल्यानंतर पोकलॅन मशिन कारवाई सुरु असलेल्या ठिकाणीच लावले जातात. सोमवारी रात्री अज्ञात व्यक्‍तींकडून त्यातील एका पोकलॅन मशिनवर दगड फेकण्यात आल्याचे व यात मशिनच्या काचा फुटल्याचे मंगळवारी सकाळी निदर्शनास आले. जिल्हाधिकारी द्विवेदी हे सकाळी आढावा घेण्यासाठी आले असता, सुरेश इथापे यांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच कोतवाली पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनाही घटनेची माहिती देण्यात आली. सदरची मोहीम संयुक्‍त असल्याने व यात प्रशासनानेच वाहने पुरविलेली असल्याने शासकीय वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी पोलिस प्रशासनाकडून तपास होऊन कारवाई केली जाईल. 

जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत असे प्रकार खपवून घेऊ नका, संबंधितांवर कठोर व कायदेशीर कारवाई करा, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या मोहिमेत अद्यापपर्यंत कुणीही विरोध केलेला नसतांना हा प्रकार उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे.दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पात्रातील भराव हटविण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. काटवन खंडोबा रोडवरील पुलापासून नालेगाव, नेप्तीरोड वरील पुलाच्या दिशेने मोहीम पुढे सरकली आहे.

हॉटेल चालकाला जिल्हाधिकार्‍यांची तंबी!

अमरधाम स्मशानभूमी जवळील परिसरात नदी पात्रामध्ये एका व्यावसायिकाने अतिक्रमण करुन हॉटेल थाटले आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या ठिकाणी जावून प्रत्यक्ष पाहणी करत सदरचे अतिक्रमण 24 तासांत काढून घेण्याच्या सूचना अतिक्रमणधारकाला दिल्या. आज बांधकाम न हटविल्या उद्या मशिन लावून कारवाई केली जाईल, अशी तंबीही जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी दिली.