अकोले : प्रतिनिधी
महाराष्ट्रात आज पेट्रोल व डिझेलचे दर देशात सर्वांधिक असून, या सरकारने चार वर्षांत बारा लाख कोटी रूपये आपल्या खिशातून काढले हे समजले देखील नाही. पण यावर लोक काही बोलत नाहीत. जर कुणी बोलले, तर नक्षलवादी, देशद्रोही ठरवून हुकूमशाही पद्धतीने त्यांना जेलमध्ये टाकले जात आहे. परंतु, चार दिवस सासूचे तसे चार दिवस सुनेचेही असतात, हे या सरकारने लक्षात ठेवावे. हिटलरची हकूमशाही देखील जनतेने मोडून काढली. सद्दाम हुसेनचा शेवटही कसा झाला, हे जगाने पहिले आहे. मोदी सरकारने याचा विसर पडू देऊ नये, असा सूचक इशारा माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी युती सरकारला दिला.
अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड व पळसुंदे या धरणाच्या लोकार्पण व जलपूजनप्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजीमंत्री मधुकर पिचड होते.
अजित पवार पुढे म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंह, प्रणव मुखर्जी, पी. चिदम्बरम यांसारख्या अर्थतज्ज्ञांनी सत्तेत येताना कधीही चुकीची आश्वासने दिली नव्हती. परंतु, नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यावर प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख टाकू, स्विस बँकेतून काळा पैसा देशात परत आणू, अशा वारेमाप घोषणा केल्या. प्रत्यक्षात परदेशातून एक दमडीही आणली नाही. भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे हा चुनावी जुमला असल्याचे बिनदिक्कतपणे सांगतात. राज्याची स्थिती यापेक्षा वेगळी नाही.
छत्रपती शिवरायांच्या नावाने हे सरकार सत्तेत आले. अरबी समुद्रात शिवस्मारकाचे भूमिपूजन केले, पण त्याचा एक दगड अजून लागलेला नाही. मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची अवस्था तशीच आहे. सव्वा लाख कोटींची बुलेट ट्रेन नेमकी कुणासाठी आहे, याला सर्वच पक्षांनी विरोध केला, पण हे मोदींचे स्वप्न असल्याने ते जनतेवर लादले जात आहे. आज देशाच्या सीमा सुरक्षित नसून, चीन व पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. अकोले तालुक्याने सातत्याने शरद पवारांना साथ दिली असून त्यांच्याच विचारांचा हा तालुका आहे. यापुढेही अशीच साथ तालुका देईल, अशी मला खात्री असल्याचे पवार म्हणाले.
यावेळी माजी मंत्री शशिकांत शिंदे म्हणाले की, शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी तुमच्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीचे निलंबन झाले. इतका तुमचा आमदार आदर्श असल्याचे आ. वैभव पिचड यांनी सिद्ध केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी आ. पिचड यांनी अकोले तालुक्यातील चार वर्षांत निधीअभावी रेंगाळलेले प्रश्न मांडले. निळवंड्याचे मुख्य कालवे भूमिगत पद्धतीचे व्हावेत, यासाठी अजित पवार यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
व्यासपीठावर माजी मंत्री आ. शशिकांत शिंदे, आ. वैभव पिचड, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, राज्य विद्यार्थी सेलचे अध्यक्ष अजिंक्य राणा पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, जि. प. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, किसान सेलचे प्रदेश उपाध्यक्ष मधुकर नवले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, सेक्रेटरी सोमनाथ धूत, अजित कदम, जिल्हा युवकचे अध्यक्ष कपिल पवार, दिलीप शिंदे, शिवाजी गाडे, दत्ता वारे, मीनानाथ पांडे, आबासाहेब थोरात, अरूण कडू, नगराध्यक्षा संगीता शेटे, गिरजाजी जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत आभाळे तर आभार विकास शेटे यांनी मानले.