Thu, Sep 19, 2019 03:28होमपेज › Ahamadnagar › शेरेबुकात चांगली नोंद तर दुसरीकडे दंड

शेरेबुकात चांगली नोंद तर दुसरीकडे दंड

Published On: Jun 13 2019 1:30AM | Last Updated: Jun 13 2019 1:50AM
श्रीगोंदा : प्रतिनिधी 

तालुक्यातील जनावरांच्या छावण्यांना कर्जत तालुक्यातील महसुली पथकाने  मोठ्या प्रमाणावर दंड ठोठावला आहे. दरम्यान, छावणीचालकांनी तहसीलदार महेंद्र माळी यांची भेट घेऊन हा दंड बेकायदेशीर असून, ज्या त्रुटी दाखवून दंड आकारणी केली आहे, तशा प्रकारची एकही त्रुटी नसल्याचे छावणीचालकांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे भरारी पथकाने छावण्यांना दिलेल्या भेटी दरम्यान शेरे बुकामध्ये चांगल्या कामाबाबत नोंद केली आहे तर दुसरीकडे दंडात्मक कारवाई केली गेली आहे. त्यामुळे श्रीगोंद्यातील छावणी चालक संतप्त झाले आहेत. दंड प्रकरणाची चौकशी करून ही दंडात्मक कारवाई रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली.

तहसीलदार महेंद्र महाजन म्हणाले, ही दंडात्मक कारवाई निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी केली आहे. त्यामुळे याबाबत त्यांच्याकडे  दाद मागावी लागणार आहे. श्रीगोंदा तालुक्यात 57 छावण्या आहेत. दि.26 ते29  एप्रिल दरम्यान श्रीगोंदा तालुक्यात सुरू असलेल्या छावण्यांची  कर्जत येथील भरारी पथकाने पाहणी केली होती.

विविध कारणे दाखवून दंडात्मक कारवाई करण्याची शिफारस जिल्हाधिकारी कार्यालय टंचाई शाखेकडे केली आहे. त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असताना 2 हजार पाचशे रुपये दंड, अग्निशामक दलाची गाडी नाही म्हणून 5 हजार दंड, पंचनाम्यावर सह्या नाहीत म्हणून 2 हजार पाचशे दंड, पशुखाद्य चारा खरेदी बिले नाहीत 1 हजार दंड, शासकीय अनुदान मिळाले नसताना या अनुदानाचा हिशोब ठेवला नाही म्हणून 5 हजार दंड अशा पद्धतीने  बोगस दंड करून छावणी चालकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. 

कोसेगव्हाण येथील छावणीचालक भीमराव नलगे म्हणाले,ज्या दिवशी कर्जत येथील पथकाने छावणीला भेट दिली. त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे उपलब्ध आहे. हे पथक किती वाजता आले, किती वाजता गेले याबाबत माहिती उपलब्ध आहे. मात्र, तरीही आमच्या छावणीला सीसीटीव्ही नसल्याचे कारण दाखवत दंड आकारणी केली आहे. त्यांनी ज्या त्रुटी दाखवल्या आहेत त्यातील एकही खरी नसून त्याबाबत आमच्याकडे सबळ पुरावे आहेत.

घोगरगावचे सरपंच बाळासाहेब उगले म्हणाले, शासनाने जाचक नियम अटी लावल्याने छावणी चालक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर बोगस दंडात्मक कारवाई करून संस्था बदनाम केल्या जात आहेत. याविरोधात खासदार डॉ. सुजय विखे यांचेकडे न्याय मागणार आहे. दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी करणार आहे.

आर्थिक उलाढालीची चर्चा? 

छावणी मधील कामकाज पाहण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पथके नेमली आहेत. भरारी पथकाने छावण्या तपासल्यानंतर प्रत्येक छावणी चालकाकडून काही रक्कम गोळा केल्याची चर्चा तहसील कार्यालय परिसरात सुरू होती. याबाबत तथ्यता किती याची खातरजमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने पाऊल उचलण्याची गरज आहे.