होमपेज › Ahamadnagar › पीकविमा योजना सर्व्हरच्या कचाट्यात

पीकविमा योजना सर्व्हरच्या कचाट्यात

Published On: Jul 21 2018 1:30AM | Last Updated: Jul 20 2018 10:30PMजवळा : दीपक देवमाने

पावसाने ओढ दिल्याने शेतकरी एकीकडे आस्मानी संकटात सापडला असताना दुसरीकडे सुल्तानी संकट त्याच्या पाठीमागे आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी दिवसभर रांगेत उभे राहूनही सर्व्हरच्या बिघाडामुळे अर्ज भरता येत नसल्याने पीक विमा योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. पीक विम्याचे अर्ज भरण्यासाठी काही दिवस बाकी असल्याने शेतकर्‍यांची धावपळ होत आहे.

जामखेड तालुक्यात पावसाने यावर्षी कमी प्रमाणात हजेरी लावल्यामुळे शेतकर्‍यांची पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजना भरण्यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्रा’मध्ये गर्दी करत आहेत. परंतु तीन दिवसांपासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेची साईट अंडर मेंटेनन्स (तांत्रिक देखरेख) दाखवत आहे. आपले सरकार सेवा केंद्र व सीएससीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी गर्दी करत आहेत परंतु साईट चालू नसल्याने केंद्र चालकांना रात्रभर जागून देखील एकही अर्ज भरला जात नाही. शेतकरी दुसर्‍याच दिवशी आपली पावती घेण्यासाठी एकच गर्दी करतात परंतु साईट बंद असल्यामुळे विमा अर्ज भरला गेला नाही असे सांगितल्यावर केंद्रचालक व शेतकरी यांच्यात वाद, शाब्दिक चकमकीव्सर घटना घडत आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अर्जाचे नेमके काय करावे हा यक्षप्रश्‍न केंद्र चालकांपुढे निर्माण झाला आहे . त्यामुळे केंद्र चालकांनी अर्ज घेण्याचे बंद केले आहे. त्यामुळे पीक विमा भरताना रांगा लावण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. त्यामुळे सरकारने पहिल्यांदा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे सर्व्हर सुरळीत केले पाहिजे. मागील वर्षीचा अनुभव घेता काही बदल होतील. सर्व्हर सुरळीत चालेल असे वाटत होते परंतु केंद्रचालकांचा व शेतकर्‍यांचा भ्रमनिरास झाला आहे. साईट दोन दोन दिवस चालत नाही. त्यामुळे केंद्रचालक ही  पीक विमा योजनेला कंटाळले आहे. कधी कधी केंद्र चालकांची विमा रक्कम खात्यातून कट झाली परंतु त्याची पावती निघाली नाही. त्यामुळे केंद्र चालकांचे देखील पैसे अडकले आहेत.

केंद्र चालकांचे पैसे अडकणे, सर्व्हरच्या अडचणी अशा विविध समस्या सोडविण्यासाठी जिल्ह्याला  स्वतंत्र यंत्रणा असणे गरजेचे आहे. परंतु तसे नसल्याने केंद्र चालकांचे व शेतकर्‍यांचे हाल होत आहे. त्यामुळे केंद्र चालकांनी सुरळीत सर्व्हर चालू झाल्याशिवाय पीक विमा घ्यायचे नाहीत असाच पवित्रा घेतला आहे. याच्यावर लवकर उपाययोजना झाली नाहीतर शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजना भरण्यापासून वंचित राहणार आहे.

केंद्रीय पातळीवर पाठपुरावा सुरू

सर्व्हर बाबतीत केंद्रीय पातळीवर पाठपुरावा चालू असून, 21 जुलै  रोजी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे सर्व्हर सुरळीत सुरू होणार असल्याचे  नगर जिल्हा सीएससीचे  व्यवस्थापक कुंदन कोरडे यांनी सांगितले.

पीक विम्याचे अर्ज भरणे जिकरीचे

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज मोठ्या प्रमाणात आले असून सर्व्हरच्या अडचणी असल्यामुळे अर्ज भरणे शक्य होत नसल्याने शेतकर्‍यांचे अर्ज घेणे जिकरीचे होत आहे. तसेच गेल्या तीन दिवसांपासून  रात्र रात्र जागत असून देखील एकही अर्ज भरले जात नाहीत. सर्व्हर लवकरात लवकर सुरू करून  शेतकरी व केंद्रचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जवळा येथील आपले सरकार सेवा केंद्राच्या संचालिका आरती देवमाने यांनी केली आहे.