Fri, Apr 26, 2019 03:23होमपेज › Ahamadnagar › पथदिवे घोटाळा : सातपुते म्हणतो फायली ठेकेदाराकडेच!

पथदिवे घोटाळा : सातपुते म्हणतो फायली ठेकेदाराकडेच!

Published On: May 24 2018 1:31AM | Last Updated: May 23 2018 11:23PMनगर : प्रतिनिधी

महापालिकेतील बहुचर्चित पथदिवे घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अभियंता रोहिदास सातपुतेची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. घोटाळ्यातील कामांच्या मूळ फायली ठेकेदार सचिन लोटकेकडेच असल्याचे सातपुतेने तपासात सांगितले आहे. त्यामुळे या दोघांची समोरासमोर चौकशी करावी लागणार आहे. त्यासाठी सातपुतेच्या कोठडीची मुदत वाढवून मागणार आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या लोटकेला चौकशीसाठी पुन्हा ताब्यात घेणार असून त्याच्या पोलिस कोठडीची मागणी न्यायालयात करणार असल्याचे तपासी अधिकारी तथा पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

अभियंता सातपुतेला काल (दि.23) तपासणीसाठी महापालिकेत आणण्यात आले होते. तपासी अधिकारी सपकाळे, तपास पथकातील मंगेश खरमाळे व इतर सहकारी यावेळी उपस्थित होते. पोलिसांनी बांधकाम व विद्युत विभागाची संपूर्ण झाडाझडती घेत काही कागदपत्रे नमुन्यासाठी ताब्यात घेतली आहे. पोलिस निरीक्षक सपकाळे म्हणाले की, सातुपतेला अटक झाल्यामुळे तपासाला गती आली आहे. या घोटाळ्यातील मूळ फायली अद्यापही गायब असून त्याचा तपास सुरु आहे. ठेकेदार लोटके याने जबाब देतांना सदरच्या फायली अभियंता सातपुते हे त्यांच्या गाडीतून घेवून गेल्याचे सांगितले होते. त्यानुसार सातपुतेकडे चौकशी केली असता त्याने फायली नसल्याचे सांगत त्या ठेकेदार लोटकेकडेच असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या दोघांची समोरासमोर चौकशी करावी लागणार आहे. त्यासाठी लोटकेच्या पोलिस कोठडीची मागणी केली जाणार आहे. अभियंता सातपुते गेल्या तीन महिन्यांपासून पसार होता. या काळात तो कोठे होता, त्याला कुणी लपविले होते, याचा तपास करणे आवश्यक आहे. त्याने ज्या गाडीतून फायली नेल्या ती जप्त करायची आहे. त्यामुळे सातपुतेच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी आज (दिण24) केली जाणार असल्याचे सपकाळे यांनी सांगितले.

दरम्यान, या घोटाळ्याप्रकरणी आरोपी भरत काळे याच्या विरोधात दोषारोपत्र यापूर्वीच दाखल करण्यात आले आहे. त्याने केडीएमसीचा पासवर्ड सातपुते व सावळे याला दिल्याचे व बांधकाम विभागातून केडीएमसी केल्याचे सांगितले आहे. त्या दृष्टीने पुढील तपासासाठी बांधकाम विभागातील दोघांची चौकशी केली जाणार आहे. काल पोलिसांचे पथक आल्यानंतर या दोनही कर्मचार्‍यांनी मनपातून पळ काढला होता. त्यांना चौकशीसाठी बोलाविणार असल्याचे सपकाळे यांनी यावेळी सांगितले. या खटल्यात लवकरच पुरवणी दोषारोप पत्र दाखल केले जाणार आहे. यात आरोपींची शक्यता वाढू शकते, असेही त्यांनी सांगितले.

संकेत कराड, अंकुश बोरुडे पुन्हा रडारवर!

ठेकेदार सचिन लोटके याने 12.50 लाख रुपये संकेत कराड व अंकुश बोरुडे यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या खात्यावर वर्ग केले आहेत. या प्रकरणी त्या दोघांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. लोटकेला साहित्य पुरविल्याच्या बिलाचे हे पैसे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही या व्यवहाराची कागदपत्रे, बिले व संपूर्ण माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना पुन्हा बोलाविणे धाडले असल्याचे तपासी अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.