Wed, Jul 17, 2019 18:46होमपेज › Ahamadnagar › फिर्याद द्यायची.. नको रे बाबा!

फिर्याद द्यायची.. नको रे बाबा!

Published On: Jan 18 2018 1:48AM | Last Updated: Jan 17 2018 11:11PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

पथदिवे घोटाळा प्रकरणी फिर्याद देण्यास कोणीही प्रमुख अधिकारी तयार होत नसल्याचे चित्र मनपात आहे. काही अधिकारी फोन बंद करुन नॉट रिचेबल झाल्यामुळे आयुक्त घनश्याम मंगळे हतबल झाले होते. अखेर प्रभाग अधिकारी अशोक साबळे यांना फिर्याद देण्यासाठी प्राधिकृत करण्याचे आदेश त्यांनी दिले. मात्र, तेही नॉटरिचेबल झाल्याची चर्चा आहे. 

आर्थिक फसवणूक झाल्याचे सिध्द झाल्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याचे आयुक्त मंगळे यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार शहर अभियंता विलास सोनटक्के फिर्याद देण्यासाठी पोलिस ठाण्यातही गेले. मात्र, या प्रकरणात सोनटक्के यांच्या सह्या असल्याने व त्यांचाही चौकशी अहवालात उल्लेख असल्यामुळे भविष्यातील न्यायालयीन प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात, असे मत पुढे आले.

त्यानंतर चौकशी अधिकारी अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे किंवा सहाय्यक संचालक नगररचना संतोष धोंगडे यांच्या मार्फत फिर्याद दाखल करण्यासाठी बराचवेळ चर्चा झडली. चौकशी अधिकार्‍यांना प्रकरणाची संपूर्ण माहिती आहे. त्यामुळे त्यांनीच फिर्याद द्यावी, असे मत पुढे आले होते. प्रभारी उपायुक्त संतोष धोंडगे यांना याची कुणकुण लागताच मोबाईल बंद करुन ते नॉट रिचेबल झाले. फिर्याद देण्यासाठी प्रमुख अधिकारी पुढे येत नसल्याने अखेर प्रभाग अधिकारी अशोक साबळे यांना प्राधिकृत केले गेले. मात्र, तेही फोन बंद करुन नॉट रिचेबल झाले असल्याने फिर्याद दाखल होणार का? याबाबत शंका निर्माण झाली आहे. राजकीय दबाव, त्यात प्रशासनाची होणारी कुचंबनाही याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

राज्य सरकारने घेतली घोटाळ्याची दखल!

गेल्या 15 ते 20 दिवसांपासून गाजत असलेल्या पथदिवे घोटाळा प्रकरणाची तक्रार राज्य सरकारकडेही करण्यात आली होती. त्याची राज्य सरकारने दखल घेतल्याचे चित्र आहे. 40 लाखांच्या घोटाळ्याच्या चौकशीसह 2016 मध्ये झालेल्या पथदिव्यांच्या कामांचा चौकशी अहवालही नगरविकास विभागाने आयुक्तांकडून मागवून घेतला आहे. काल (दि.17) सकाळपासूनच उपसचिव सुधाकर धोंडे यांनी अहवालासाठी प्रशासनाला धारेवर धरले होते.