Thu, Aug 22, 2019 12:30होमपेज › Ahamadnagar › पाथरी प्रश्‍नी मुख्यमंत्र्यांना भेटणार : हावरे

पाथरी प्रश्‍नी मुख्यमंत्र्यांना भेटणार : हावरे

Published On: Jan 21 2018 2:43AM | Last Updated: Jan 20 2018 11:43PMशिर्डी : प्रतिनिधी

शिर्डीच्या साईबाबांची जन्मभूमी म्हणून राज्य सरकार परभणी जिल्ह्यातील पाथरी गावांचा विकास आराखडा तयार करून विकास करण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर शिर्डी ग्रामस्थांनी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांची साई अतिथीगृह येथे काल भेट घेतली. यावर हावरे यांनी आपण शिर्डीकरांसमवेत असून यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व देशाचे महामहिम यांना भेटण्यासाठी ग्रामस्थांसमवेत जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

साईबाबांच्या हयातीत त्यांचे साईचरित्र लिहिले गेलेले असताना बाबांनीच त्यांच्या जाती-धर्माचा, कुळाचा, मुळाचा व जन्मस्थळाचा उल्लेखही साई चरित्रात येऊ न देण्यासाठी प्रयत्न केलेले दिसतात. त्यामुळे शिर्डीकर व साईभक्त या चरित्रास प्रमाण मानतात. मात्र, देशाचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी समाधी शताब्दी सोहळ्याच्या उद्घाटनादरम्यान पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी असून त्या ठिकाणचा विकास करावा. त्यानंतर पाथरी गावाच्या विकासासाठी राज्यस्तरावर साईंची जन्मभूमी हालचालींना वेग आला आहे. अशी माहिती ग्रामस्थांना समजली होती. 

शिर्डीकरांचा त्या गावाच्या विकासाला विरोध नाही. मात्र, साईंची जन्मभूमी असा शब्दाचा वापर करून विकास केला जात असेल तर विरोध असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. याप्रसंगी कैलास बापू कोते, डॉ. एकनाथ गोंदकर, सुधाकर शिंदे, कमलाकर कोते, अभय शेळके, शिवाजी गोंदकर, पतिंगराव शेळके आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.