Tue, Apr 23, 2019 14:27होमपेज › Ahamadnagar › ट्रक-ट्रॅव्हल्स अपघातात दोघे जागीच ठार

ट्रक-ट्रॅव्हल्स अपघातात दोघे जागीच ठार

Published On: Feb 28 2018 1:19AM | Last Updated: Feb 28 2018 12:03AMपाथर्डी : प्रतिनिधी 

कल्याण-विशाखापट्टणम् राष्ट्रीय महामार्ग 61 वर पाथर्डी तालुक्यातील माळी बाभूळगाव येथे ट्रक व खाजगी ट्रॅव्हल्सचा अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला. पुण्याहून परभणीकडे प्रवासी घेऊन जाणार्‍या खाजगी ट्रॅव्हल्स (ए आर 20 1490) व बीड जिल्ह्यातील माजलगाववरुन सरकीपेंड घेऊन जाणार्‍या ट्रकला (एम एच 12 ई क्यू 8879) खाजगी बसने समोरून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. यात बस व ट्रकच्या दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक परमेश्वर लोखंडे (वय 24) तर बस चालक सोपान ढाकणे (वय 32) अशी मृतांची नावे असून ढाकणे हा परभणी तर लोखंडे हा बीड जिल्ह्यातील देवराई तालुक्यातील रुई येथील रहिवासी आहे. 

मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि ट्रॅव्हल्सची सामोरा समोर धडक होऊन मोठा अपघात झाला. बस मधूला सात ते आठ प्रवाशांना दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी घटनास्थळावर धाव घेतली व जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ सुपारे, पोलीस नाईक वाल्मिकी पारधी, जमादार भाऊसाहेब तांबे , पोलिस कॉन्स्टेबल भगवान सानप आदींनी स्थानिक रहिवास्यांच्या मदतीने मदत कार्य केले. 

अपघातात दोन्ही गाड्यांचा पुढचा भाग चक्काचूर झाला. अपघातांनंतर मयत दोन्ही चालक गाडीत जागेवर अडकल्याने सकाळी जेसीबीच्या साह्याने एकमेकात गुंतलेल्या गाड्या ओढून वेगळ्या केल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. यावेळी पोलिस हवालदार अरविंद चव्हाण, कॉन्स्टेबल नय्युम पठाण, संजय आव्हाड, राजेंद्र डोळस आदी पोलिस कर्मचार्‍यांसह स्थानिक नागरिक अरुण कोलते, जिलनी शेख, अनिल वायकर, फिरोज शेख, महंमद शेख यांनी मदत केली.