Thu, Jun 20, 2019 07:31होमपेज › Ahamadnagar › पाथर्डीत व्यापार्‍यांचे गेट बंद आंदोलन

पाथर्डीत व्यापार्‍यांचे गेट बंद आंदोलन

Published On: Apr 12 2018 1:22AM | Last Updated: Apr 11 2018 11:37PMपाथर्डी : शहर प्रतिनिधी

बाजार समितीने बैल बाजारासाठीचे प्रवेशद्वारापुढील जागा खासगी व्यापार्‍याला कराराने दिल्याच्या निषेधार्थ व्यापार्‍यांनी गेटबंद आंदोलन करून प्रतिकात्मक स्वरूपात खासगी जागेत बैलबाजार भरवून बाजार समितीच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.

शहराच्या मध्यवस्तीत राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला बाजार समितीचे भव्य मैदान असून, तेथे बैल बाजार भरतो. शेवगाव रस्त्याच्या बाजूने बैल बाजराचे प्रवेशद्वार व धक्का आहे. या प्रवेशद्वारावर बाजार समितीने खासगी व्यापार्‍याला भूखंड दिल्यानंतर बांधकाम सुरू झाले. या कामाला हरकत घेत गेल्या आठ दिवसांपासून व्यापार्‍यांनी संघर्षाचे हत्यार उपसले आहे. बाजार समितीचे अध्यक्ष, सचिवांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध करत बैल बाजार बाहेर भरवला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, म्हणून तहसीलदार नामदेव पाटील यांनी आंदोलकांशी संवाद करून वादग्रस्त बांधकामाला आठ दिवस स्थगिती देण्याची सूचना बाजार समितीला केली. यावेळी अरुण नरवडे, भगवान गर्जे, तबूजी  बोडखे आदींनी तहसीलदारांपुढे कैफियत मांडली. 

व्यापारी हद्दीत बाजार समितीने कुठलीही बांधकामे करू नयेत, बाजार समितीकडून शेतकरी व व्यापार्‍यांना कुठल्याही सुविधा मिळत नाहीत. स्वच्छता गृहाअभावी कुचंबणा होते. बाजार समितीच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला असतो. बाटल्या फुटल्यावर काचा गोळा करून बाजार करावा लागतो. गेट पुढील अतिक्रमणे हटविण्याची मागणी प्रशासनाकडे करूनही दखल घेतली जात नाही. वादग्रस्त बांधकाम थांबवून मेन गेट खुले करावे, अशी मागणी केली. सभापती बन्सी आठरे म्हणाले, बाजार समितीचा कारभार स्वच्छ असून, या आंदोलनमागे निव्वळ राजकारण आहे. जागेबाबत संचालक मंडळाचा ठराव व पणन मंडळाची परवानगी आहे.