होमपेज › Ahamadnagar › मशाल यात्रेस मोठा प्रतिसाद

मशाल यात्रेस मोठा प्रतिसाद

Published On: Dec 12 2017 2:03AM | Last Updated: Dec 11 2017 11:32PM

बुकमार्क करा

पाथर्डी : शहर प्रतिनिधी

भगवान बाबा की जय, गोपीनाथ मुंडे अमर रहे, भक्त बाबांचा कार्यकर्ता साहेबांचा, पंकजाताई तुम आगे बढो, अशा घोषणा देत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त भगवानगड ते गोपीनाथगड मशाल यात्रेला या वर्षीपासून सुरूवात करण्यात आली. पुढील वर्षी मशाल यात्रेला भव्य स्वरूप देण्याचा संकल्प संयोजकांनी जाहीर केला. बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे पती विजय गोल्हार, राहुल कारखेले, क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे सतीश पालवे, उद्योजक बाबासाहेब ढाकणे, पंचायत समिती सदस्य गोकुळ दौंड, ज्येष्ठ भाजपा नेते अशोक चोरमले, शेवगावचे नगरसेवक अरुण मुंडे, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष नागनाथ गर्जे, संजय दहिफळे, संजय कीर्तने, दत्तात्रय खेडकर, मिथुन डोंगरे, माणिक बटुळे आदी कार्यकर्त्यांनी यात्रेचे नेतृत्व केले. 

भगवानगड व गोपीनाथगडाची जवळीक असून भगवानगडाचा दुसरा टप्पा म्हणजे गोपीनाथगड असे चित्र निर्माण करण्याचा पंकजा मुंडे समर्थकांकडून प्रयत्न सुरू असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. मशाल यात्रेत बीड व नगर जिल्ह्यातील तरुण कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. भगवान बाबांच्या समाधीपुढे मुंडेंचा जयघोष करत मशाल प्रज्वलीत करून यात्रा गोपीनाथ गडाकडे (परळी) निघाली. खरवंडी येथे चौक सभा घेऊन संयोजकांनी मशाल यात्रेचे समाजिक महत्त्व स्पष्ट केले. विजय गोल्हार म्हणाले की, नवरात्रीमध्ये देवीची मशाल जशी भाविकांकडून काढली जाते, तशा श्रद्धेने भगवानबाबा व गोपीनाथ मुंडे भक्तांनी या वर्षीपासून मशाल यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्याचे दैवत म्हणून दोन्ही गडांकडे पाहिले जाते. दोन्ही गड एकच आहेत. भाविकांनी मनात कुठलाही संशय बाळगू नये. समाजाच्या दृष्टीने भगवानबाबा व गोपीनाथ मुंडे दैवत आहेत. मुंडेनी संपूर्ण जीवन समाजाला समर्पित केले. गोपीनाथ गडावर मंगळवारी (दि. 12) दुपारी बारा वाजण्यापूर्वी मशाल यात्रा पोहोचेल. प्रज्ञा मुंडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे, अ‍ॅड. यशश्री मुंडे यांच्या उपस्थितीत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीला आदरांजली वाहून यात्रेची सांगता होईल. नगरसेवक अरूण मुंडे म्हणाले की, लोकनेते मुंडे यांनी राज्यातील जनतेवर अतोनात प्रेम केले. पाथर्डी तालुक्याला त्यांनी मावशीचा दर्जा दिला होता. त्यांच्यावर प्रेम करणार्‍या कार्यकर्त्यांनी मशाल यात्रेचे आयोजन केले आहे. त्यामुळे दोन्ही गडांचे नाते घट्ट करण्याचा प्रयत्न साधला जाणार आहे. मुंडेचे जीवन समाजाला समर्पित होते. दोन्ही गडामध्ये वाद उत्पन्न करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. भगवानबाबांना मानणारे मुंडे घराणे आहे. त्यामुळे साहेबांवर व बाबांवर प्रेम करणारे सर्वजण पंकजा मुंडे यांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत. मुंडे व भगवान गडाचे नाते कायम राहिल. कोणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केल्यास तो यशस्वी होणार नाही.