Wed, Feb 26, 2020 02:44होमपेज › Ahamadnagar › पाथर्डीत अवैध धंद्यांना ‘अच्छे दिन’

पाथर्डीत अवैध धंद्यांना ‘अच्छे दिन’

Published On: Dec 03 2017 1:10AM | Last Updated: Dec 02 2017 11:47PM

बुकमार्क करा

पाथर्डी : प्रतिनिधी

पाथर्डी शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध व्यवसायिकांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. ‘अर्थ’पूर्ण व्यवहारांच्या मोबदल्यात बेकायदा दारू विक्री, मटका, पाकिटमारी, वाद्यांचा खेळ, जुगार अड्ड्यांना संरक्षण मिळू लागले आहे. त्यामुळे तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडू लागल्याचा आरोप नागरिकांकडून होऊ लागला आहे.

वादग्रस्त ठरलेल्या पोलिस निरीक्षकांची सुमारे पाच महिन्यांपूर्वी पाथर्डी पोलिस ठाण्यातून उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागेवर नवीन अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आली. ते हजर झाल्यानंतर अवैध व्यवसायांना आळा बसेल, अशी आशा होती. परंतु, ती आता फोल ठरू लागली आहे. उलट अवैध व्यावसायिकांना अच्छे दिन आले आहेत. पानटपर्‍यांपेक्षा मटक्याच्या टपर्‍यांची संख्या वाढली आहे. शहरातील चिंचपूर रस्ता, कोरडगाव रस्ता, शेवगाव रस्ता, नगर रस्ता आदी परिसर मटक्याच्या टपर्‍यांनी व्यापला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह मध्यमवर्गीय नागरिक मटक्याच्या आहारी गेले आहेत. शहरात उघडपणे मटक्याचे आकडे घेतले जातात. तरीही पोलीस कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाही. तसेच मोबाईलवर मॅसेज द्वारे देखील मटका खेळला जातो.पोलिसांकडून किरकोळ कारवाई करून कारवाई केल्याचे सोंग आणले जाते.

जुगार अड्ड्यांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढतच चालले असून गल्लोगल्ली जुगार अड्डे चालू आहेत. ‘अर्थ’पूर्ण व्यवहारांच्या बदल्यात जुगार चालकांना संरक्षण देण्यात येत आहे. एखाद्या नागरीकाने जुगार अड्ड्याची  माहिती जर पोलिसांना कळविली, तर तात्काळ संबंधितांचे नाव जुगार चालकांना कळविण्याची तसदी घेतली जात आहे. यातून गुन्हेगारीचा आकडा वाढून गुन्हेगारांची दहशत वाढून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. शेवगाव रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून वाधीचा आणि टायगर बिस्किटंचा खेळ भर रोडवरच चालू केला आहे. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत परगावाचे अनेक विद्यार्थी दोन्ही बसस्थानकाकडे जाताना किंवा येताना या खेळाच्या आहारी जात आहेत. ‘आमचे कुणी काहीही करू शकत नाही’, अशा अविर्भावात हे लोक वावरत आहेत.