Wed, Apr 24, 2019 19:47होमपेज › Ahamadnagar › कॅफोंचे महिनाभर बेकायदा कामकाज?

कॅफोंचे महिनाभर बेकायदा कामकाज?

Published On: Apr 06 2018 1:30AM | Last Updated: Apr 05 2018 10:25PMनगर : प्रतिनिधी

पथदिवे घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल होऊन 48 तासांपेक्षा अधिक काळ कोठडीत असलेल्या मनपाच्या मुख्य लेखा व वित्त अधिकार्‍यांवर वित्त विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र, 31 मार्च रोजी बजावलेल्या आदेशात 8 मार्चपासून निलंबन केल्याचे स्पष्ट करण्यात आल्यामुळे ‘कॅफों’नी कालपर्यंत केलेले 29 दिवसांचे कामकाज कायदेशीर की बेकायदेशीर असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातही वित्त विभागाचा 31 मार्चचा आदेश 5 एप्रिलपर्यंत दडवल्याची चर्चाही मनपात सुरु आहे.

लेखाधिकारी झिरपे व प्रभारी उपायुक्‍त विक्रम दराडे यांना 8 मार्च रोजी अटक झाल्यानंतर मनपा प्रशासनाने पोलिस कारवाईचा अहवाल नगरविकास व वित्त विभागाकडे सादर केला होता. 48 तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ कोठडीत असलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्याची तरतूद कायद्यात आहे. याच पार्श्‍वभूमीवर आयुक्‍तांनी हा अहवाल सादर केला होता. त्यामुळे शासनाकडून तात्काळ झिरपे यांचे निलंबन होणे आवश्यक होते. मात्र, त्यानंतर आजपर्यंत तब्बल 23 दिवसांनी 31 मार्च रोजी वित्त विभागाने 8 मार्च 2018 पासूनच्या निलंबनाचे आदेश बजावले.

नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी सु. द. धोंडे यांनी मनपाला काल पत्र पाठवून झिरपे यांच्या विभागीय चौकशीसाठी दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी माहिती मागविली. त्यामुळे 6 दिवसांनी झिरपे यांचे निलंबन झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे 31 मार्चपासून हा आदेश दडविला कोणी? असा सवालही उपस्थित झाला आहे.

वित्त विभागाने 8 मार्चपासून निलंबन केले असले तरी कालपर्यंत कॅफो झिरपे हे मनपात कार्यरत होते. अटकेच्या कारवाईनंतर त्यांच्या निलंबनाचे आदेश न आल्यामुळे आयुक्तांनी त्यांना हजर करुन घेतले होते. त्यामुळे आजपर्यंतचे त्यांनी केलेले कामकाज कायदेशीर की बेकायदेशीर असा संभ्रम निर्माण झाला आहे. एखाद्या अधिकारी, कर्मचार्‍यावर पोलिस कारवाई होऊन 48 तास कोठडीत राहिल्यास त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली जाते. निलंबनाचे आदेश उशिराने दिले गेले, तरी ज्या तारखेला अटक झाली असेल त्या तारखेपासून निलंबन मानीव धरण्यात यावे, अशी स्पष्ट तरतूद कायद्यात आहे. त्यानंतरही आयुक्‍तांनी झिरपे यांना हजर करुन घेतल्यामुळे आयुक्‍तांची भूमिकाही वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची चिन्हे आहेत.

Tags : nagar, nagar news, Path lights scam case ,