Wed, Jul 17, 2019 18:02होमपेज › Ahamadnagar › राष्ट्रवादीचे दोन समर्थक पोलिसांच्या रडारवर?

राष्ट्रवादीचे दोन समर्थक पोलिसांच्या रडारवर?

Published On: Feb 07 2018 1:35AM | Last Updated: Feb 06 2018 10:31PMनगर : प्रतिनिधी

पथदिवे घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी भरत काळे याच्याकडून पोलिसांना महत्वाची माहिती प्राप्त झाली आहे. आक्षेप असलेल्या देयकांच्या पावत्या संकेत कराड याने सादर केल्याचे तसेच अंकुश बोरुडे यांच्या विराज डेव्हलपर्सच्या खात्यात ठेकेदाराच्या खात्यातून रक्कम वर्ग झाल्याचे पोलिसांनी काल (दि.6) न्यायालयात सांगितले. दरम्यान, कराड व बोरुडे हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाचे जवळचे कार्यकर्ते असल्याने या प्रकरणात ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पुन्हा एकदा लक्ष्य होण्याची चिन्हे आहेत.

आरोपी काळे याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे काल त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक तथा तपासी अधिकारी यांनी तपासाची माहिती देतांनाच न झालेल्या ज्या कामांची देयके अदा करण्यात आली आहेत, त्या देयकांच्या पावत्या संकेत कराड याने आरोपी काळे याच्याकडे सादर केल्याचे तपासात पुढे आल्याचे सांगितले. तसेच ठेकेदार सचिन लोटके यांच्या बँक खात्याची स्टेटमेंट तपासण्यात आले असून मनपाच्या खात्यातून 34 लाखांची रक्कम त्याच्या खात्यात वर्ग झाली आहे व त्यातील 7.50 लाख रुपये अंकुश बोरुडे यांच्या विराज डेव्हलपर्स यांच्या खात्यात आरटीजीएने वर्ग झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात दोन्ही उपायुक्‍तांची व आरोपी काळे याची समोरासमोर चौकशी करायची आहे. तसेच बांधकाम विभागातील दोघांचा यात सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्यांचीही चौकशी करायची आहे. बजेट रजिस्टर मनपाकडून नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यातील नोंदींचीही तपासणी करायची आहे. तीन आरोपींचा शोध सुरु आहे.

त्यामुळे पुढील तपासासाठी काळे यास आणखी 7 दिवस पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी तपासी अधिकारी सपकाळे व सरकारी अभियोक्‍ता सीमा देशपांडे यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी आर. एम. कुलकर्णी यांच्याकडे केली.

आरोपीच्या वतीने अ‍ॅड. संजय दुशिंग यांनी युक्‍तिवाद करतांना पोलिसांकडून गेल्या 9 दिवसांत भरत काळे हा त्यांच्या कस्टडीत असतांनाही कुठलाही तपास झाला नसल्याचा दावा केला. तो या घोटाळ्यात ‘लाभार्थी’ नाही. ज्यांनी घोटाळा केला ते पसार झाले. काळे याने वरीष्ठांच्या दबावामुळे त्यांना पासवर्ड दिलेला असल्याचे सांगत पोलिसांच्या मागणीला त्यांनी विरोध दर्शविला. मात्र, ‘पासवर्ड’ची जबाबदारी ही आरोपीचीच आहे व दबाव टाकून त्याच्याकडून पासवर्ड घेतल्याबाबत त्याने तसा रिपोर्टही त्यावेळी केलेला नाही, या मुद्द्यावर न्यायालयाने आरोपीच्या वकीलांचा युक्‍तिवाद फेटाळून लावला व आरोपी काळे याला 9 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी वाढवून दिली.

दरम्यान, संकेत कराड व अंकुश बोरुडे हे दोघेही उपनगरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाचे जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. पोलिस तपासात त्यांची नावे आल्याने या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ताधार्‍यांकडून पुन्हा एकदा लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे.    

कराड, बोरुडेंची होणार चौकशी : सपकाळे

बजेट रजिस्टर पोलिसांकडे सादर झाले असून त्यात नोंदी कशा घेतल्या जातात? ते कसे हाताळले जाते? याची माहिती पोलिस घेत आहेत. आरोपी काळे व उपायुक्‍तांची समोरासमोर चौकशी करायची आहे. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी बोलावणार आहे. तसेच अंकुश बोरुडे यांच्या विराज डेव्हलपर्सच्या खात्यावर 7.50 लाख रुपये जमा झाले आहेत. संकेत कराड याने देयकांच्या पावत्या काळे याच्याकडे जमा केल्या आहेत. या दोघांची चौकशी केली जाणार आहे. तसेच कामे प्रस्तावित असलेल्या जागेवर जावून तपासणी होणार असल्याचेही पोलिस निरीक्षक सपकाळे यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.

सातपुते म्हणतात.. मुख्यालय सोडू द्या!

पथदिवे घोटाळा प्रकरणात आरोपी असलेले उपशहर अभियंता व विद्युत विभागाचे प्रमुख रोहिदास सातपुते यांना महापालिकेने यापूर्वीच निलंबित केलेले आहे. त्यांनी काल (दि.6) आयुक्‍तांना अर्ज देवून 6 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी या काळात मुख्यालय सोडण्याची परवानगी मागितली आहे. 29 जानेवारीला गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिस सातपुते यांचा शोध घेत असतांना त्यांच्या सहीचे पत्र आयुक्‍तांकडे सादर झाले असल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. दरम्यान, सातपुते यांना अशी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.