Tue, Jul 23, 2019 11:23होमपेज › Ahamadnagar › जिल्हा सर्वाधिक पासपोर्टधारकांचा व्हावा

जिल्हा सर्वाधिक पासपोर्टधारकांचा व्हावा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

विदेश मंत्रालयाने नगरमध्येच पासपोर्ट कार्यालय सुरु केल्याने नागरिकांचा वेळ व पैसा वाचणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे कमीत कमी वेळ व  कागदपत्रांमध्ये नागरिकांना पासपोर्ट उपलब्ध होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यालयाचा लाभ घ्यावा. राज्यात जिल्हा सर्वात जास्त पासपोर्टधारकांचा व्हावा, यासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन खा.दिलीप गांधी यांनी केले.

पासपोर्ट सेवा केंद्र कार्यालयाचे उद्घाटन जनरल पोस्ट ऑफिस कार्यालयात  खा. गांधी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी  खा. सदाशिव लोखंडे. विदेश मंत्रालयाचे सचिव डॉ.ज्ञानेश्‍वर मुळे, महापौर सुरेखा कदम, पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवाले, जतीन पोटे, वरिष्ठ पोस्टमास्तर बाळासाहेब वाघ, प्रवर अधीक्षक जालिंदर भोसले, सुवेंद्र गांधी आदींसह विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खा. लोखंडे म्हणाले, राज्यात नगर जिल्ह्याचे कार्यक्षेत्र सर्वांत मोठे आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पासपोर्ट सारखे महत्त्वाचे कार्यालय सुरू  झाले हे सौभाग्य. शिर्डी लोकसभा मतदारसंघातही हे कार्यालय सुरु करावे, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करु. प्रत्येक शेतकर्‍यांच्या हातात भविष्यात पासपोर्ट असावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

डॉ.ज्ञानेश्‍वर मुळे म्हणाले, पासपोर्ट कार्यालयासाठी  खा.गांधी यांनी अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला. 125 कोटी जनता असलेल्या भारतात केवळ 6 टक्के नागरिक पासपोर्टधारक आहेत ही शोकांतिका. यासाठी विदेश मंत्रालयाने प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला असून, आतापर्यंत 180 नवीन पासपोर्ट कार्यालये सुरु केली आहेत. पासपोर्टचे सबलीकरण व्हावे व नागरिकांची लूट करणारे एजंट या प्रक्रियेपासून लांब रहावेत, यासाठी कडक नियम व अटी लागू केल्या आहेत.

आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड ही ओळखपत्रे फक्त देशातच चालतात. परंतु, पासपोर्ट हा संपूर्ण जगात तुमची साथ देतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पासपोर्टधारक व्हावे व देशाच्या विकासात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. पुण्याचे क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवाले यांनी प्रास्तविकात कार्यालयामार्फत मिळणार्‍या सेवेची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत नळके यांनी केले. आभार पुण्याचे प्रोटोकॉल प्रभारी जतीन पोटे यांनी मानले.

 

Tags : Ahmednagar, Ahmednagar news, Passport Office,


  •