Fri, Apr 26, 2019 03:23होमपेज › Ahamadnagar › स्वातंत्र्याच्या दुसर्‍या लढाईत सहभागी व्हा! : अण्णा हजारे 

स्वातंत्र्याच्या दुसर्‍या लढाईत सहभागी व्हा! : अण्णा हजारे 

Published On: Jun 16 2018 1:28AM | Last Updated: Jun 15 2018 11:48PMपारनेर : प्रतिनिधी 

युवा शक्ती हिच राष्ट्रशक्ती आहे. स्वातंत्र्याचा खरा आनंद उपभोगायचा असेल तर तरुणांनी निर्भयपणे स्वातंत्र्याच्या दुसर्‍या लढाईत, व्यवस्था परिवर्तनाच्या नव्या  चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

हजारे यांच्या 80 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाच्या, व्यवस्था परिवर्तनाच्या नव्या चळवळीचा प्रारंभ  हजारे यांच्या उपस्थितीत पारनेर महाविद्यालयात शुक्रवारी करण्यात आला. पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे, पत्रकार संजय वाघमारे, प्राचार्य डॉ.रंगनाथ आहेर, लाभेश औटी, सुरेश पठारे आदी यावेळी उपस्थित होते.

हजारे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे उलटली. मात्र देशातील जनतेला स्वातंत्र्याचा खरा आनंद उपभोगता येत नाही, ही शोकांतिका आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी तरुणांनी पुढे येणे आवश्यक आहे. तरुणांनी आपापल्या गावात भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे संघटन उभारल्यास संघटीत कार्यकर्त्यांना राळेगणसिध्दी येथे आंदोलनाचे  प्रशिक्षण दिले जाईल. गावपातळीपासून देश पातळीपर्यंत शिस्तबध्द संघटना बांधणीचे काम सुरू आहे. तालुका पातळीवर दीड ते दोन हजार, जिल्हा पातळीवर सुमारे पंधरा ते वीस हजार तर राज्य पातळीवर सुमारे सहा लाख प्रशिक्षीत कार्यकर्त्यांची फौज उभी राहिल. या संघटीत कार्यकर्त्यांनी गाव, तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर एखादा प्रश्‍न हाती घेतल्यावर प्रशासनाला, सत्ताधार्‍यांना दखल घ्यावीच लागेल व प्रश्‍न मार्गी लागतील.

सध्याची पक्षीय निवडणूक पद्धत घटनाबाह्य असून घटनेतील कलम 84 परिच्छेद ख आणि ग नुसार भारतीय नागरीक असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढवता येईल, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. राजकीय पक्षांमार्फत निवडणूक लढविण्याबाबत घटनेत तरतूद नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेली निवडणूक पद्धत चुकीची असल्याचे हजारे म्हणाले. ही पद्धत बदलावी, निवडणूक लढविण्यासाठी राजकीय पक्षांना बंदी घालावी, मतदान यंत्रावरील निवडणूक चिन्ह हटवून त्या ऐवजी स्वतंत्र(अपक्ष) रितीने निवडणूक लढवणार्‍या उमेदवाराचे छायाचित्र असावे. यासाठी आपण गेल्या सहा वर्षांपासून निवडणूक आयोगाशी संघर्ष करीत असल्याचे हजारे यांनी सांगीतले.

झावरे म्हणाले की, अण्णांनी राजकीय पक्षांविरोधात भूमिका घेतली असली तरी तालुक्यातील सर्वच नेते सर्व प्रथम अण्णांचे कार्यकर्ते आहेत. आमच्यासाठी राजकीय भूमिका दुसर्‍या, तिसर्‍या स्थानावर आहे. आम्ही अण्णांच्या आंदोलनात नेहमीच सहभागी होत आहोत. यापुढेही आंदोलनात अग्रभागी राहू अशी ग्वाही झावरे यांनी दिली. संजय वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. हरेश शेत्रके यांनी सूत्रसंचालन केले.