Tue, May 21, 2019 18:10होमपेज › Ahamadnagar › तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न

तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न

Published On: Dec 14 2017 1:43AM | Last Updated: Dec 14 2017 12:37AM

बुकमार्क करा

पारनेर ः प्रतिनिधी     

तालुक्यातील कोहकडी येथील कुकडी नदीपात्रातून वाळूचा बेकायदा उपसा करणार्‍या पोकलेन व ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार भारती सागरे यांच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना जीवे मारण्याचा प्रकार काल (दि.13) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला. वाळूतस्करांकडून तहसीलदार सागरे यांना धक्काबुक्की करण्यात येऊन पथकातील कर्मचार्‍यांवर दगडफेकही करण्यात आली. सुमारे तीन तास मोठ्या जमावाच्या मदतीने वाळूतस्करांनी नदीपात्रात धुडगूस घातला. 

मुळा तसेच काळू नदीपात्रांमध्ये पाणी असल्याने तेथून वाळूतस्करी करताना मोठ्या अडचणी येत असल्याने, वाळूतस्करांनी कुकडी नदीसह विविध गावांतील ओढ्यांना आपले लक्ष्य केले आहे. त्याविरोधात तक्रारी वाढल्याने तहसीलदार सागरे यांनी वाळूतस्करांविरोधात कारवाई सुरू केली आहे. कारवाईसाठी तहसीलदार सागरे या काल (दि.13) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पथकासह कोहकडी येथे पोहचल्या. वाळूतस्करांना माहिती मिळू नये, यासाठी त्यांनी टेम्पोमधून प्रवास करून नदीपात्र गाठले.

तेथे पोहचल्यावर यांत्रिक उपकरणांच्या मदतीने वाळूउपसा सुरू होता. पथकाने एक पोकलेन व वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. कारवाईची माहिती समजल्यानंतर काही काळात वाळूतस्कर मोठा जमाव सोबत घेऊन नदीपात्रात दाखल झाले. ताब्यात घेण्यात आलेले पोकलेन पळवून नेण्यासाठी त्यांनी दंडेली सुरू करताच, तहसीलदार सागरे या मशिनमध्ये जाऊन बसल्या. त्यानंतर वाळूतस्कर तसेच सागरे व पथकातील कर्मचार्‍यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. बाचाबाचीचे पर्यावसान सागरे यांना धक्काबुक्की तर कर्मचार्‍यांना मारहाण करण्यात झाले. दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नही झाला. सागरे या कारवाईवर ठाम असल्याचे लक्षात आल्यानंतर, एका तस्कराने पोकलेनच्या डिझेल टाकीतून दोन ड्रम डिझेल काढले. ते पोकलेन तसेच सागरे यांच्या अंगावर ओतून एका तस्कराने पोकलेनला आग लावली. त्याच वेळी पथकातील कर्मचारी प्रशांत सोनवणे यांनी सागरे यांना  पोकलेनवरून खाली ओढले. त्यामुळे पुढील दुर्घटना टळली.

तहसीलदार सागरे पोकलेनपासून दूर झाल्यानंतर वाळूतस्करांनी आग विझवून  पोकलेन तसेच ट्रॅक्टर घटनास्थळावरून पळवून नेले.  सुमारे पाऊण तास हा प्रकार सुरू होता. त्यादरम्यान पथकातील कर्मचार्‍यांनी निघोज दूरक्षेत्रातील पोलिस कर्मचार्‍यांशी संपर्क करून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिस तेथे आल्यानंतरही वाळूतस्करांची दंडेली सुरूच होती. त्यांच्या दहशतीमुळे काही कर्मचारी आजूबाजूला लपून बसले. तर तहसीलदार सागरे व इतर कर्मचारी जवळच्या मंदिरात थांबले. पोलिस उपनिरीक्षक संजय मातोंडकर हे घटनास्थळी पोहचल्यानंतर कर्मचारी एकत्र जमा झाले. घटनास्थळावर जाऊन त्यांनी झालेल्या प्रकाराची माहिती मातोंडकर यांना दिली.

दोषींवर कारवाई करून गुन्हे दाखल केल्याशिवाय घटनास्थळ न सोडण्याची  भूमिका सागरे व  कर्मचार्‍यांनी घेतली. मातोंडकर यांनी पंचनामा करून पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करून घेण्याची तयारी दाखविल्यानंतर साडेपाचच्या सुमारास हे पथक पारनेरकडे परतले. यासंदर्भात तहसीलदार सागरे यांच्याशी संपर्क साधला असता, कोहकडी येथेे वाळूउपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना माहिती देउन आम्ही तेेथे गेलो होतो. तेथे वाळूतस्करांनी घातलेल्या उच्छादानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी पालवे तसचे गौणखणीकर्म अधिकारी संजय बामणे यांच्याशी संपर्क करून माहिती देण्यात आली. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काहीही मदत मिळाली नसल्याची तक्रार त्यांनी केली. एका तस्कराने आम्ही गौण खनिज अधिकार्‍यांना हप्ते देतो, तुम्ही आमच्यावर का कारवाई करता? असा सवालही सागरे यांना करून गौणखनिज विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला.   

दरम्यान, राजू कुरंदळे, गोविंद कुरंदळे, विठ्ठल कुरंदळे, सुहास शिंदे, रामा पवार, अमोल पवार, राजू वाखारे, भाऊसाहेब माळी, नित्याकुमार चव्हाण, पांडुरंग थोरात, ज्ञानेश्‍वर आंधळे आदींविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. आरोपींची नावे वाढण्याची शक्यता असून, घटनास्थळी काढण्यात आलेल्या छायाचित्रांच्या आधारे आरोपींची नावे निष्पन्न करण्यचे काम उशिरापर्यंत सुरू होते. हे आरोपी अण्णापूर (ता.शिरूर, जि.पुणे) व पारनेर तालुक्यातील आहेत. तहसीलदार सागरे यांच्यासह मंडलाधिकारी सारिका उंडे, तलाठी राजेंद्र ढगे व बी. सी. शेख, प्रशांत सोनवणे, श्रीपत उमाप, माळी यांचा या पथकात समावेश होता. 

जिल्हाधिकारी कार्यालयातून फूस?  तालुक्यातील वाळूसाठ्यांवर नजर असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिकार्‍यांनी तहसीलदार सागरे यांच्या या छाप्याची माहिती वाळूतस्करांना दिल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांनीच फूस लावल्यामुळेच तस्करांनी हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून खणीकर्म अधिकारी तालुक्यातील वाळूतस्करीविरोधात परस्पर कारवाई करीत आहेत. या कारवाईमुळे वाळूतस्कर व प्रशासनात तेढ निर्माण झाली आहे. त्यातूनच हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.  

 प्रांताधिकारी दाणेज तहसीलमध्येच बसून! तहसीलदारांनी हल्ला झाल्याबाबतची माहिती वरिष्ठांना कळविली. पोलिसांनाही माहिती देण्यात आली. अवघे दोन पोलिस कर्मचारी साध्या वेशात घटनास्थळी पोहोचले. तहसीलदारांच्या यंत्रणेने वारंवार संपर्क साधूनही वरिष्ठांकडून मदत मिळत नसल्याचे पाहून, वाळू तस्करांची मुजोरी वाढली. प्रांताधिकारी गोविंद दाणेज घटनास्थळाकडे निघाले. मात्र, संभाव्य धोक्यामुळे त्यांनी नंतर तहसील कार्यालयातच बसणे पसंत केले.