Wed, Apr 24, 2019 15:38होमपेज › Ahamadnagar › सेनेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर

सेनेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर

Published On: Mar 06 2018 1:52AM | Last Updated: Mar 05 2018 10:23PMपारनेर : विजय वाघमारे

आ. विजय औटी यांच्या 61 वी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे व्यासपीठावरून हेलीपॅडकडे परतत असताना आ. औटी यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे तालुक्याच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला धक्‍का बसला. दगडफेकीमागील नेमक्या कारणाबाबत मतभिन्नता असली तरी त्याचे पडसाद मात्र आगामी काळात उमटण्याची चिन्हे आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर जिल्हा नियोजन समितीमध्ये काशिनाथ दाते यांना पाठविण्याची आ. औटी यांनी व्यूहरचना केली होती.  निलेश लंके यांनी स्वतःच्या पत्नीचा अर्ज दाखल करून जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी विजयदेखील संपादन केला. जिल्हा नियोजन समितीची निवडणूकच आ. औटी व लंके यांच्यात दुरावा निर्माण करणारा कळीचा मुद्दा ठरली.

त्यानंतर नवरात्रात मोहटादेवी  दर्शनयात्रेच्या शुभारंभानंतर उभायतांमधील संवाद जवळपास संपुष्टात येऊन लंके यांनी आ. औटी विरोधकांशी घरोबा करण्यात सुरूवात केली. विशेषतः सुजित झावरे यांच्या सोबतची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली. विविध ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्येही लंके यांचा कल औटी विरोधी गटाकडेच असल्याचे दिसून आले. त्याविरोधात उपतालुकाप्रमुख विकास रोहकले यांनी आवाज उठविला व लंके यांच्या तालुकाप्रमुख पदाच्या राजीनाम्याची मागणी केली. या मागणीनंतर लंके समर्थकांनी सोशल मीडियावर रोहकले यांच्याविरोधात अक्षरशः गदारोळ केला. हा वाद संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर यांच्यापर्यंत पोहचला.

त्यांनी त्यातून तोडगा काढण्याचे अश्‍वासन दिले, मात्र पुढे ते हवेतच विरले. त्यातून सर्वमान्य तोडगा काढण्यात कोरगावकर यांना यश आले असते तर आ. औटी यांच्या अभिष्टचिंतन सोहळयात जे काही घडले ते पाहण्याची वेळच पारनेरकरांवर आली नसती हे खरे. आ. औटींच्या अभिष्टचिंतन सोहळयाच्या नियोजनात निलेश लंके यांचा सहभाग नव्हता. कार्यक्रम पत्रिकेमध्येही ठाकरे कुटुंबीय तसेच आ. औटी यांचे छायाचित्र छापण्यात येऊन इतर कोणाच्या नावांनाही स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे छायाचित्रे तसेच नावांवर आक्षेप घेण्याची संधीही औटी समर्थकांनी दिली नाही. अशा स्थितीत निलेश लंके तसेच राणी लंके यांनी सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न होणे पसंत केले असते तर ते अधिक उचित ठरले असते. मात्र उत्साही समर्थकांचा आग्रह लंके हे न डावलू शकल्याने खुद्द पक्षप्रमुखांपुढे जे रामायण घडले त्यात लंके हे टिकेचे धनी ठरले.
 

पक्षप्रमुख परतत असताना उत्साही समर्थकांची घोषणाबाजी, त्यातून उडालेला गोंधळ व गोंधळातच झालेल्या दगडफेकीत फुटलेली वाहनाची काच  यामुळे निलेश लंके यांच्यापुढील अडचणी अधिकच वाढल्या. अर्थात त्यांनी झालेला प्रकार दुर्देवी असल्याचे सांगत कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर झालेल्या चुकांची कबुली देत दोन पाऊले मागेे घेण्याची भूमिका घेतली. पक्षप्रमुख व्यासपीठावर येण्यापूर्वी व्यासपीठावर येणे गरजेचे होते हे देखील लंके यांनी मान्य करीत पक्षप्रमुखांप्रती माफीनामाही सादर केला. पक्षसंघटनेच्या माध्यमातून लंके यांनी तालुक्याच्या प्रत्येक गावात संघटन उभे केले असून तगड्या संपर्क यंत्रणेमुळे विशेषतःतरूणाईस त्यांचे आकर्षण आहे.

याच आकर्षणापेटी त्यांचे समर्थक सन 2019 चे भावी आमदार म्हणून सोशल मीडियावर त्यांचा प्रचार करीत आहेत. लंके मात्र विधानसभा लढविण्याबाबत अजूनही इन्कार करीत आहेत. अशा स्थितीमध्ये एकसंघ असलेल्या शिवसेनेमध्ये दुफळी निर्माण झाल्याने सर्वसामान्य शिवसैनिक मात्र अस्वस्थ आहे. आ. औटींच्या वाहनावर झालेली दगडफेक व त्यानंतर सोशल मीडियावर सुरू असलेले शीतयुद्ध या पार्श्‍वभूमीवर आ. औटी यांनी कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचा, प्रत्युत्तर न देण्याचा सल्‍ला दिला आहे. लंके यांनीही कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहीपणास लगाम घालून संयमाने वाटचाल करण्याचा सल्‍ला देण्याची अत्यंत गरज आहे.