Sun, Mar 24, 2019 08:16होमपेज › Ahamadnagar › पारनेरला अतिक्रमणांवर पडणार हातोडा

पारनेरला अतिक्रमणांवर पडणार हातोडा

Published On: Dec 28 2017 1:55AM | Last Updated: Dec 28 2017 1:55AM

बुकमार्क करा
पारनेर ः प्रतिनिधी

पारनेर ते सुपे रस्त्याची दुरूस्ती तसेच रूंदीकरणासाठी 28 कोटींचा निधी मंजूर झाला असून प्रत्यक्षात कामास सुरूवात झाल्यानंतर शहरातील तहसील कार्यालय ते ग्रामिण रूग्णालयापर्यंतच्या अतिक्रमणांवर हातोडा पडणार आहे. या रस्त्याची दुरूस्ती तसेच रूंदीकरण सन 2006 मध्ये करण्यात आले. त्यावेळीही बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात येउन या परिसराचा श्‍वास मोकळा झाला होता. पुढील सुमारे दोन वर्षे अतिक्रमणे झाली नाहीत. त्यानंतर मात्र हळूहळू अतिक्रमणे वाढून पुन्हा एकदा या रस्त्याला अतिक्रमणांनी विळखा घातला आहे. सन 2006 मधील कारवाई दरम्यान बसस्थानक परिसरातील अतिक्रमणधारकांनाच त्याचा फटका बसला होता.

तहसिल कार्यालय परिसरातील अतिक्रमणे त्यावेळी बचावली होती. आता अतिक्रमणे तसेच रस्त्यावर लावण्यात आलेल्या वाहनांमुळे तहसील कार्यालय ते बसस्थानकादरम्यान वाहतुकीची कोंडी नित्याचीच होउन बसली आहे. वाहतूकीस अडथळा येत असतानाही केवळ व्यवसायीकांचे नुकसान नको म्हणून आजवर अतिक्रमणांविरोधात कारवाई झाली नाही. या रस्त्यावरील वाढती रहदारी लक्षात घेऊन शासनाने या रस्त्याच्या रूंदीकरणाचा निर्णय घेतला असून रूंदीकरण तसेच दुरूस्तीसाठी तब्बल 28 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून काम सुरू झाल्यानंतर रस्त्यासाठी अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही.

त्यात तहसील कार्यालय तसेच बसस्थानक परिसरातील सर्व अतिक्रमणांवर हातोडा पडणार आहे. अळकुटी रस्त्यावरील पेट्रोलपंप ते सुपे बसस्थानकादरम्यान हा रस्ता होणार आहे. शहरातील पेट्रोलपंप ते ग्रामीण रूग्णालयादरम्यान सिमेंट काँक्रिटचा रस्ता होईल व तेथून पुढे डांबरीकरण करण्यात येईल. एकूण 14 किलोमिटर अंतराच्या या रस्त्यासाठी 28 कोटींचा निधी मंजुर झाला आहे. काँक्रिटच्या रस्त्यावर दुभाजक बसविण्याचे नियोजन असून रस्त्याच्या दुतर्फा गटार व त्यावर पादचारी मार्ग तयार करण्यात येणार आहे.  सध्या या रस्त्याची रूंदी साडेपाच मिटर असून नव्या आराखड्यानुसार हा रस्ता आता 10 मीटर रूंद होणार आहे. त्यामुळे दुतर्फा अडीच मीटरने रस्त्याची रुंदी वाढेल. रस्त्यानंतर गटार व त्यावरील पादचारी मार्गासाठीही आणखी काही जागेची आवश्यकता भासणार आहे.