Tue, Mar 19, 2019 05:08होमपेज › Ahamadnagar › सरकारच्या पुतळ्याचे राळेगणसिद्धीत दहन 

सरकारच्या पुतळ्याचे राळेगणसिद्धीत दहन 

Published On: Mar 24 2018 1:45AM | Last Updated: Mar 24 2018 12:04AMपारनेर : प्रतिनिधी    

दिल्‍लीतील रामलिला मैदानावर काल (दि.23) पासून सुरू झालेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या नागरिकांची वाहने अडविण्यात आली. तसेच दिल्‍लीकडे जाणार्‍या रेल्वेच्या फेर्‍या रद्द केल्याच्या निषेधार्थ राळेगणसिद्धी परिवाराने मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्‍त केला. दरम्यान, हजारे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी उपसरपंच लाभेश औटी यांच्यासह ग्रामस्थांनीही उपोषण सुरू केले आहे. 

काल सकाळी ग्रामस्थांनी यादवबाबा मंदिराच्या प्रांगणात एकत्र येत, गावातून रॅली काढली. पद्मावती मंदिरात रॅली गेल्यानंतर तेथे महात्मा गांधींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. रॅली पुन्हा संत यादवबाबा मंदिराच्या प्रांगणात आल्यानंतर तेथे उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये उपसरपंच लाभेश औटी यांच्यासह काही ग्रामस्थांनी उपोषण सुरू करून हजारे यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला. तर उर्वरित ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी लाक्षणिक उपोषण केले. 

हजारे यांनी आंदोलनास प्रारंभ करण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदी सरकारकडून आंदोलनाकडे येणार्‍या कार्यकर्त्यांची वाहने अडविली जात आहेत, रेल्वेच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत, कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह पाण्याचे फवारे मारण्याची व्यवस्था करण्यात आल्याचा आरोप केला. हजारे यांनी केलेल्या या आरोपाचे वृत्त राळेगणसिद्धीत पोहचताच ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे यादवबाबा मंदिराच्या प्रांगणात दहन करण्यात आले. त्यावेळी मोदी सरकारच्या धिक्‍काराच्या तर हजारे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी  झाली.
 

 

 

tags : Parner,news, anna, hazare's, movement,in Ralegansiddhi,