Tue, Nov 20, 2018 04:02होमपेज › Ahamadnagar › तर इंग्रजांपेक्षा जास्त दडपशाही सुरू होईल : अण्णा हजारे

तर इंग्रजांपेक्षा जास्त दडपशाही सुरू होईल : अण्णा हजारे

Published On: Feb 21 2018 1:21AM | Last Updated: Feb 21 2018 1:21AMपारनेर  :  प्रतिनिधी     

राजकारण्यांच्या भ्रष्ट कारभारापासून देशाला वाचविण्याचे प्रयत्न झाले नाही, तर इंग्रजांपेक्षाही अधिक दडपशाही राजकारण्यांकडून होईल, अशी भीती व्यक्‍त करतानाच समविचारी कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनात सहभागी होण्याचे अशवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पत्रकाद्वारे केले. सशक्‍त लोकपाल, तसेच शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर हजारे हे 23 मार्च रोजी दिल्‍ली येथे देशव्यापी आंदोलन सुरू करणार आहेत.

या आंदोनाच्या जनजागृतीसाठी हजारे यांचे देशभर दौरे सुरू असून, या पार्श्‍वभूमीवर त्यांनी पत्रक प्रसिद्धीस देउन देशवासीयांना आंदोलनात सहभागी होण्याची साद घातली आहे. पत्रकात म्हटले आहे, देशात 1952 मध्ये पहिली निवडणूक झाली. त्यावेळी 7 ते 8 पक्ष राजकारणात होते. या पक्षांमध्ये सत्ता मिळविण्याची स्पर्धा सुरू झाली. त्यातून भ्रष्टाचार व पैशातून सत्ता हे चक्र सुरू झाले. त्यामुळे राजकारणातील अनेक लोक समाज व देशाच्या हितापासून दूर गेले. 

स्वातंत्र्यानंतर भ्रष्टाचार, गुंडगिरी, शासकीय पैशांची लूट वाढत गेली. देशातील गरीब व श्रीमंतामधील दरी वाढत गेली. स्वातंत्र्यानंतर पर्यावरण व मानवाचे शोषण सुरू झाले. पर्यावरणाचे शोषण करून  झालेला विकास शास्वत नाही. अशा विकासाने विनाश होईल. ज्याप्रमाणे नशेमध्ये असलेल्या व्यक्‍तीची अवस्था असते, तीच अवस्था पैशांच्या नशेत असलेल्या राजकारण्यांची आहे. त्यांना जागेवर आणण्यासाठी सर्वांनी देशासाठी देण्याचा निर्धार करणे गरजेचे आहे.

समान विचारधारा असलेल्या कार्यकर्त्यांनी संघटीत होण्याची वेळ आली आहे. तसे न झाल्यास गोर्‍या इंग्रजांपेक्षाही जास्त दडपशाही  देशातील या काळ्या इंग्रजांकडून होईल. देश एक एक पाऊल दडपशाहीकडे वाटचाल करू लागला असल्याची भीतीही हजारे यांनी या पत्रकात व्यक्‍त केली आहे. 
दिल्‍लीत होणारे आंदोलन शेतकर्‍यांचे प्रश्‍न तसेच लोकपाल व लोकायुक्‍त कायद्याला कमजोर करून मोदी सरकारने देशातील जनतेला दिलेला धोका यावर होईल. या आंदोलनाशी 22 राज्यांतील लाखो नागरीक जोडले जात आहेत हा आशेचा  किरण आहे. याच संघटनाच्या जोरावर लोकपाल, लोकायुक्‍त सारखे प्रश्‍न सुटू शकतील, असे हजारे यांनी पत्रकात म्हटले आहे.