Sun, Oct 20, 2019 01:09होमपेज › Ahamadnagar › पारनेर नगरपंचायत निवडणुकीत आघाडीने मारली बाजी

आ. विजय औटी यांना धक्‍का

Published On: May 24 2018 1:31AM | Last Updated: May 23 2018 11:53PMपारनेर : प्रतिनिधी 

पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीत आ. विजय औटी यांना चांगलाच धक्‍का बसला. या निवडणुकीत अपक्ष, राष्ट्रवादी व शिवसेना बंडखोर आघाडीने बाजी मारली. नगराध्यक्षपदी अपक्ष वर्षा शंकर नगरे, तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे बंडखोर चंद्रकांत रघुनाथ चेडे यांनी काल (दि.23) झालेल्या उत्कंठावर्धक निवडणुकीत विजय मिळविला. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना प्रत्येकी दोन मतांनी पराभव पत्करावा लागला.

नगराध्यक्ष पदासाठी नगरे व उपनगराध्यक्ष पदासाठी चेडे यांना प्रत्येकी 9, तर शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वैशाली आनंदा औटी व उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार दत्तात्रय कोंडीबा कुलट यांना प्रत्येकी 7 मते मिळाली. बंडखोर गटासोबत सहलीस गेलेले शिवसेनेचे नंदकुमार देशमुख हे निवडीच्या वेळी अनुपस्थित राहिले. नगरपंचायत निवडणुकीत ‘होमग्राऊंड’मध्येच झालेला पराभव हा आ. विजय औटी यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. 

नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून वैशाली औटी तर आघाडीकडून वर्षा शंकर नगरे यांनी अर्ज दाखल केलेले होते. काल (दि. 23) सकाळी 10 वाजता उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला. शिवसेनेच्या वतीने दत्तात्रय कुलट यांनी सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर डॉ. मुद्स्सर सय्यद यांनी सूचक तर किसन गंधाडे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली. बंडखोर गटाच्या वतीने चंद्रकांत चेडे यांनी सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी अर्ज दाखल केला.

त्यांच्या अर्जावर नंदकुमार औटी यांनी सूचक तर सुरेखा भालेकर यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली.
उपनगराध्यक्ष पदाचे अर्ज दाखल झाल्यानंतर तर्क-वितर्कांना दोन तास चांगलेच उधाण आले होते. दुपारी दीड वाजता जयश्री औटी व गणेश शेळके हे सत्ताधारी सात नगरसेवकांना घेऊन नगरपंचायतीच्या सभागृहात दाखल झाले. त्यानंतर 1 वाजून 45 मिनिटांनी आघाडीचे 9 सदस्य दाखल झाले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद दाणेज व मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी यांनी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली. दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी त्यांनी निकाल जाहीर केला. त्यानंतर आघाडीच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, शिवसेनेचे पदच्युत तालुकाप्रमुख नीलेश लंके, भाजपाचे  पदाधिकारी वसंत चेडे यांनी विरोधी आघाडीच्या विजयासाठी व्यूहरचना केली होती. 

सत्ताधारी शिवसेनेचे 10 पैकी 5 सदस्य विरोधकांच्या कळपात सामील झाल्याच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत नेमके काय होणार, याची तालुक्यासह जिल्ह्यात उत्सुकता होती. आ. औटी यांचे शहरासह तालुक्यात वर्चस्व असताना, शिवसेनेत पडलेली फूट, पक्षात झालेली बंडाळी शमविण्यासाठी औटी यांच्याकडून झालेले प्रयत्न, या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी शहरासह तालुक्यातील जनतेने नगरपंचायत परिसरात मोठी गर्दी केली होती.