Sun, Mar 24, 2019 23:16
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › उद्याच्या मंत्रिमंडळात आ. औटी यांना संधी

उद्याच्या मंत्रिमंडळात आ. औटी यांना संधी

Published On: Feb 28 2018 1:19AM | Last Updated: Feb 28 2018 12:20AMपारनेर : प्रतिनिधी    

विजयराव, तुम्ही आमदार आहात. उद्याही आमदार असणार आहात. उद्याच्या भगव्या सत्‍तेमध्ये तुमच्या बुद्धीमत्‍तेचा, काम करण्याच्या पद्धतीचा योग्य पद्धतीने वापर केल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आ. औटी यांना मंत्रिमंडळात संधी देण्याची ग्वाही दिली.  आ. औटी यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्‍त शहरातील किसान इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ठाकरे बोलत होते. सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, माजी आ. अनिल राठोड, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे व रावसाहेब खेवरे, महापौर सुरेखा कदम, जयश्री औटी, अनिकेत औटी, डॉ. तृप्ती औटी, काशिनाथ दाते, तालुका प्रमुख नीलेश लंके, रामदास भोसले, गणेश शेळके, विकास रोहकले, सुरेश बोर्‍हुडे, शिवाजी बेलकर, दत्‍ता कुलट, चंद्रकांत चेडे, अर्जुन भालेकर आदी यावेळी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले की,  आ. औटी सन 2004 पासून विधानसभेत प्रतिनिधीत्व करतात. मात्र आजवर त्यांनी स्वतःसाठी कधीही काही मागितले नाही. ज्या ज्या वेळी ते येतात, त्यावेळी मतदारसंघ व नागरीकांसाठी मागणी करणारा हा अत्यंत विश्‍वासू माणूस आहे. पारनेरकरांनी आम्हाला असा एक सैनिक, सहकारी दिला आहे. त्यांनी आजवर कधीही त्रास दिला नाही, यापुढेही देणार नाहीत. त्यासाठी पारनेरकरांचे कौतुक केले पाहिजे. सध्या देशात बँक घोटाळ्यांतून पैसा खाल्‍ला जातोय. डल्‍ला मारला जातोय. जेवढे ओरबडता येईल तेवढे ओरबडून घ्यायचे व पळून जायचे, ही आजकालची वृत्‍ती झाली आहे. ठाकरे घराण्याकडे लपवा छपवीचे काही नाही. जे काही आहे ते सगळे तुमचे आहे. तुम्ही सुद्धा आमचेच आहात. हिच आमची संपत्‍ती आहे. आमच्याकडे काळे पांढरे काही नाही. जे काही आहे ते भगवं आहे. आमची वडिलोपार्जीत भगवी संपत्‍ती आहे. लोकांचे हे वैभव जपण्याची परंपरा विजयरावांनी जोपासली. 

या जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी शिवजयंती व शिवाजी महाराजांविषयी जे काही ऐकायला मिळाले त्यावरून भाजपा सरकारची वृत्‍ती उघडी पडली आहे. आम्ही भगव्याचे पाईक आहोत. आम्हाला निवडणुकीपुरती शिवाजी महाराजांची आठवण येत नाही. आमच्या हृदयात, मनात, शरीरात श्‍वास असेपर्यंत शिवराय असणार आहेत. निवडणुका आल्या की चलोचले, छत्रपतींचे आशिर्वाद, याची भाजपाला आठवण होते. देशाला मजबूत सरकारची गरज होती म्हणून लोकसभा निवडणुकीत आम्हीही मोदींचा उदो उदो केला. मे महिन्यात केंद्रातील सरकारला चार वर्षे पूर्ण होतील.

पण एकही प्रश्‍न सुटला नाही. लोकसभा निवडणुकीवेळी अपेक्षा केली होती की पाकिस्तानला धडा शिकविला जाईल. अच्छे दिन येतील. मात्र तसे काहीच झाले नाही. उलट शेतकर्‍यांची वाट लावून टाकली आहे. शेतकर्‍यांनी घाम गाळून ठेवी ठेवलेल्या जिल्हा बँकांना टाळे ठोकण्यात आले. लोकांना खरे पाहण्याची सवय राहिली नसून जो स्वप्न दाखवितो, तो माझा, अशी सवय रूढ होउ लागली आहे. इतरांचे अनुभव वाईट आले म्हणून चमत्कारी बाबांना मते दिली जातात. त्यात मात्र त्यांचे भले होते व तुम्ही तसेच राहता. यापुढे हे चालणार नाही. मते देताना पाच वर्षांपूर्वी जे बोललात, ते का केले नाही, हे विचारावे लागेल असे ठाकरे म्हणाले.