पारनेर : प्रतिनिधी
दुधाचे दर वाढवून देण्यात यावाते, या मागणीसाठी तालुक्यातील पानोली येथे संतप्त शेतकर्यांनी काल (दि.9) तासभर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास दुग्धाभिषेक करून ग्रामस्थांना दुधाचे मोफत वितरण करण्यात आले. आंदोलनामुळे पारनेर-शिरूर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.
भाकपचे सचिव संतोष खोडदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित आंदोलनात ज्येष्ठ नेते नारायणराव गायकवाड, अंकुश गायकवाड, संजय भगत, दादाभाऊ वारे, श्याम गायकवाड, बापूराव भगत, भागवत गायकवाड, अशोक गायकवाड, दादाभाऊ गायकवाड, बापू गावाडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
खोडदे म्हणाले, दुधाचे दर कोसळण्यास सरकारचे बेजबाबदार धोरण कारणीभूत आहे. मागील वर्षी शेतकर्यांनी आंदोलन केले. त्यावेळी दुधाला किमान 27 रुपये भाव दिला जाईल, भाव कमी देणार्या दूध संकलन केेंद्रांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातील, असे आश्वासन दिले होते.मात्र ते अद्यापर्यंत पाळले गेले नाही. खाजगी दूध संकलन केंद्रांमध्ये शेतकर्यांच्या दुधामध्ये भेसळ करण्यात येऊन एका टँकरचे तीन टँकर तयार केले जातात. परिणामी अतिरिक्त दूध निर्मिती होऊन भाव कोसळतात. हेच भेसळयुक्त दूध शहरातील ग्राहकांना 40 ते 50 रुपये दराने विकले जाते. त्यामुळे शेतकरी व ग्राहकांची फसवणूक होते. अशा भेसळीविरोधात कठोर पाउले उचलणे गरजेचे आहे. दुधाच्या भुकटीस शासनाने अनुदान जाहीर केले आहे. परंतु शासनाच्या या धरसोडीच्या धोरणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय भुकटीसंदर्भात साशंकात निर्माण होऊन खरेदीदार प्रतिसाद देत नाहीत.
गायकवाड म्हणाले, जनावरांसाठी लागणार्या भुसा, पेंड, सुग्रास तसेच हिरव्या चार्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत, तर दुधाचे दर मात्र घसरत आहेत. त्यामुळे हा दूध उत्पादन आतबट्ट्याचा झाला आहे. पाण्याच्या बाटलीपेक्षाही दूध कमी दरावे विकले जात आहे. पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार यांना निवेदन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.