Sun, Aug 25, 2019 03:36होमपेज › Ahamadnagar › जनतेसाठी संघर्ष न करणारांची संघर्षयात्रा! : पंकजा मुंडे 

जनतेसाठी संघर्ष न करणारांची संघर्षयात्रा! : पंकजा मुंडे 

Published On: Sep 08 2018 1:31AM | Last Updated: Sep 07 2018 11:15PMकरंजी : वार्ताहर

पंधरा वर्षे सत्तेत असताना काँग्रेस-राष्ट्रवादीने सरकारी तिजोरीवर डल्ला मारला. तेच आता हल्लाबोल आंदोलन करताना दिसत आहेत. ज्यांनी कधी जनतेसाठी संघर्ष केला नाही, असे लोक आता संघर्ष यात्रेच्या नावाखाली जनतेसमोर जाण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर केली. 

पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी शिराळ येथे आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नातून राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघातील रस्त्याच्या कामासाठी मंजूर करण्यात आलेल्या 57 कोटी रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन ना. मुंडे यांच्या हस्ते झाले. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी होते. यावेळी खा. दिलीप गांधी, आ. मोनिका राजळे, आ. बाळासाहेब मुरकुटे, बबनराव पाचपुते, डॉ अमित पालवे, सुभाष पाटील, अक्षय कर्डिले, भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

ना. मुंडे पुढे म्हणाल्या, विकासकामांच्या जोरावरच पुढील लोकसभा, विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. सत्तर वर्षे देशात सत्ता असणारे आम्हाला पाच वर्षांचा हिशेब विचारत आहेत. विरोधकांची संघर्ष यात्रा म्हणजे एक बनाव आहे. संघर्ष यात्रेपेक्षा स्टेजवर बसणार्‍यांची संख्या मोठी असते. भाजपाच्या सत्ताकाळात राज्यात 30 हजार कोटींची रस्त्यांची कामे पूर्ण केली आहेत. नगर जिल्ह्यात 1361 किलोमीटरचे रस्ते डांबरीकरणाने जोडले जाणार असून, त्यासाठी 775 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघातील 120 किलोमीटरचे रस्ते डांबरीकरणाने जोडले जाणार आहेत.

आ कर्डिले म्हणाले, ना. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या  स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्याची जबाबदारी उचलली असून, त्यांनी जलयुक्तच्या माध्यमातून राज्य टँकरमुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढील काळात त्यांनी राज्याची जबाबदारी सांभाळावी व त्यांचे पती डॉ. अमित पालवे यांनी नगर जिल्ह्याची  जबाबदारी स्वीकारावी, असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला . 

माजीमंत्री बबनराव पाचपुते म्हणाले, मराठा समाजाचे अकरा मुख्यमंत्री होऊनही आरक्षण मिळाले नाही. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला निश्‍चित आरक्षण देतील. श्रीगोंद्यासाठी ना. मुंडे यांनी भरीव निधी दिला आहे. आ. कर्डिले हे तेल लावलेले आणि राजकारणात कसलेले पैलवान आहेत. आ. कर्डिले राजकारणात आपल्याला ठेपत नाहीत, म्हणून अनेकजण त्यांना अडकविण्याचा प्रयत्न करत असतात. 

विखेंचे सुदर्शनचक्र एकदा लोकसभा निवडणुकीत कर्डिलेंना भोवले, तर गांधीना पावले. त्यानंतरच्या राहुरी विधानसभेच्या निवडणुकीत तेच सुदर्शनचक्र माझ्यावर ओढून घेतल्याने, कर्डिलेंच्या राजकारणाला मोकळी वाट झाली, असा गौप्यस्फोट जेष्ठनेते सुभाष पाटील यांनी यावेळी केला. कार्यक्रमाचे प्रास्तविक आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले.