Sun, Mar 24, 2019 06:50होमपेज › Ahamadnagar › दोन पोलिसांवर बडतर्फीचे सावट!

दोन पोलिसांवर बडतर्फीचे सावट!

Published On: Mar 21 2018 1:41AM | Last Updated: Mar 20 2018 10:42PMनगर : प्रतिनिधी

पांगरमल विषारी दारुकांड प्रकरणात 5 पोलिस कर्मचार्‍यांची विभागीय चौकशी पूर्ण झाली आहे. त्यातील दोन कर्मचार्‍यांना पोलिस सेवेतून कमी का करण्यात येऊ नये व तीन कर्मचार्‍यांना वेतनवाढ का रोखण्यात येऊ नये, याबाबत म्हणणे सादर करण्याबाबतची नोटीस बजाविण्यात आलेली आहे. त्या नोटीसावर संबंधितांचे म्हणणे प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजले. 

सुमारे 13 महिन्यांपूर्वी बनावट विषारी दारुकांडाच्या वेगवेगळ्या घटनेत 14 जणांचा बळी गेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक केलेल्या एका आरोपीशी काही पोलिसांचा विशेष ‘स्नेह’ असल्याची बाब चर्चेत आली. त्यावेळी प्राथमिक चौकशीनंतर एक पोलिस उपनिरीक्षक व इतर दोन कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले होते. यात आरोपीशी विशेष ‘स्नेह’ असलेल्या कर्मचार्‍याला ‘क्‍लिन चिट’ मिळाली होती. त्यामुळे ही कारवाईही संशयाच्या फेर्‍यात अडकली होती. प्राथमिक चौकशीनंतर जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या पाच पोलिस कर्मचार्‍यांची श्रीरामपूरचे अपर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार यांच्यामार्फत विभागीय चौकशी करण्यात आली. त्याबाबतचा चौकशी अहवाल त्यांनी नुकताच जिल्हा पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे सादर केला होता. 

चौकशी अहवालानंतर अधीक्षक शर्मा यांनी पाच कर्मचार्‍यांना नोटीसा पाठविलेल्या आहेत. त्यातील दोन कर्मचार्‍यांना पोलिस सेवेतून कमी का करण्यात येऊ नये व तीन कर्मचार्‍यांना वेतनवाढ का रोखण्यात येऊ नये, याबाबत म्हणणे सादर करण्याबाबतची नोटीस बजाविण्यात आलेली आहे.