Wed, Apr 24, 2019 21:34होमपेज › Ahamadnagar › पालघर जिल्हा केला, संगमनेर का नाही?

पालघर जिल्हा केला, संगमनेर का नाही?

Published On: Apr 07 2018 1:41AM | Last Updated: Apr 07 2018 12:25AMसंगमनेर : प्रतिनिधी 

नगर जिल्ह्याचे विभाजन करण्यास विरोध नाही. जिल्ह्याचे मुख्यालय कोणते असावे, असा आग्रही आम्ही कधी धरला नाही. सरकारला नगर जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांचे विभाजन करायचेच असेल, तर याबाबतची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे, असे मत व्यक्त करतानाच संगमनेर जिल्हा यापूर्वीच व्हायला पाहिजे होता. महसूल विभाग संगमनेर तालुक्याकडेच होता. तुमच्या सहीने पालघर जिल्हा होतो, तर मग संगमनेर का नाही झाला? असा सवाल विरोधी पक्षनेते राधकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर जिल्हा मागणी कृति-समितीला केला.

संगमनेर जिल्हा मागणी कृति- समितीने विरोधी पक्षनेते विखे यांची गुरुवारी लोणी येथे भेट घेतली. आणि जिल्हा विभाजनाबाबत आग्रही भूमिका घेण्याची मागणी केली. शिष्टमंडळाने संगमनेर जिल्हा करण्याबाबतचे सविस्तर निवेदन ना.विखे पाटील यांना सादर केले. शिष्टमंडळातील सदस्यांनी संगमनेरात सुरू असलेल्या आंदोलनाची सविस्तर माहिती चर्चेदरम्यान ना. विखे यांना दिली. आतापर्यंत सव्वालाख सह्या नागरिकांच्या झाल्या आहेत. साखळी उपोषणही आम्ही सुरू केले आहे. आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्याची भूमिका आपण घ्यावी, अशी मागणी शिष्टमंडळातील सदस्यांनी ना.विखे यांच्याकडे केली.

राज्यात नगर जिल्ह्याबरोबच पुणे, मालेगाव, बीड, सोलापूर या जिल्ह्यांच्या विभाजनाची मागणीही आता पुढे आली आहे. जिल्हा विभाजनासाठी अशा पद्धतीची आंदोलने सर्वत्र सुरू झाली, तर सरकारपुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवून विरोधी पक्षनेते ना. विखे म्हणाले की, प्रशासकीय बाबींबरोबरच जिल्हा विभाजनासाठी मोठ्या आर्थिक तरतुदीची गरज आहे. आर्थिक संकटात असलेले राज्य सरकार जिल्हा विभाजनासाठी आर्थिक तरतूद कशी करणार ? याकडे लक्ष वेधतानाच शेतकरी कर्जमाफी, सातवा वेतन आयोग याची आर्थिक आव्हान सरकारपुढे आधीच आहेत. त्यामुळे जिल्हा विभाजनाच्या प्रश्‍नाला सरकार कितपत गांभिर्याने घेईल, याकडे त्यांनी शिष्टमंडळाचे लक्ष वेधले.

संगमनेर जिल्हा व्हावा, यासाठी कृति-समितीने सुरू केलेल्या आंदोलनाचे गांभीर्य सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी कृति- समितीच्या शिष्टमंडळाची भेट मुख्यमंत्र्यांसमवेत आपण घडवून आणू. संगमनेरात सुरू केलेल्या साखळी उपोषणाला भेट देण्यासही मला कोणतीही अडचण नाही. पण संगमनेर जिल्हा होण्यासाठी यापूर्वीच संधी होती. कारण महसूल विभाग आपल्या तालुक्याकडेच होता. पालघर जिल्ह्याच्या विभाजनाचा निर्णय झाला, त्याचवेळी संगमनेर जिल्हा होण्याचा निर्णय का झाला नाही? असा सवाल विरोधी पक्षनेत्यांनी संगमनेर जिल्हा मागणी कृति-समितीच्या सदस्यांना केला.

याप्रसंगी जिल्हा मागणी कृति- समितीचे राजाभाऊ देशमुख, शरद थोरात, अमोल कवडे, निवृत्त प्राचार्य दसरे, रऊप शेख, शिवाजीराव कोल्हे, शाम कर्पे, धनंजय मुर्तडक, किशोर नावंदर, अरुण कुलकर्णी आदी कृति- समितीचे सदस्य, तसेच नागरिक उपस्थित होते.