Fri, Jan 18, 2019 12:58होमपेज › Ahamadnagar › उपनिरीक्षक चांभळे लाचेच्या सापळ्यात

उपनिरीक्षक चांभळे लाचेच्या सापळ्यात

Published On: Feb 22 2018 1:30AM | Last Updated: Feb 22 2018 1:28AMश्रीगोंदा : प्रतिनिधी

श्रीगोंदा पोलिस ठाण्यात नव्यानेच रुजू झालेले पोलिस उपनिरीक्षक गणेश जांभळे यास मध्यस्थामार्फत तीन हजार रूपयांची लाच घेताना नगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.21) सायंकाळी सातच्या सुमारास अटक केली.

तक्रारदार वापरत असलेल्या मोबाइलवर धमकीचे फोन येत होते. त्यांनी धमकी देणारा कोण याचा, शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी यासाठी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. तक्रारदाराने नगर येथील सायबर सेलकडेही अर्ज दिला होता. या अर्जाची शाहनिशा करून संबधित व्यक्तिवर कारवाई करण्यासाठी हा अर्ज पोलिस उपनिरीक्षक जांभळे याच्याकडे आला. जांभळे यांनी तक्रारदाराकडे कारवाई करण्यासाठी पाच हजार रूपयांची मागणी केली. तडजोडीअंती तीन हजार रूपयांवर ही कारवाई करण्याचा निर्णय झाला.

मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी नगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदविली. त्यानुसार पथकाने सायंकाळी 7 वाजता पोलिस ठाण्याच्या आवारात सापळा लावला. पोलिस उपनिरीक्षक जांभळे यास प्रसाद आनंदकर या मध्यस्थामार्फत तीन हजार रूपयांची लाच स्वीकारताच पथकाने या दोघाना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपधीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलिस निरीक्षक शाम पवरे, सुनील पवार, एकनाथ आव्हाड, शेख तन्वीर, प्रशांत जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.