Tue, Mar 26, 2019 11:42होमपेज › Ahamadnagar › पंतप्रधान साधणार लाभार्थ्यांशी संवाद!

पंतप्रधान साधणार लाभार्थ्यांशी संवाद!

Published On: Jun 04 2018 1:02AM | Last Updated: Jun 03 2018 11:15PMनगर : प्रतिनिधी

शहरी भागांत राबविल्या जाणार्‍या पंतप्रधान आवास योजनेतील एमआयएस पोर्टलवर नोंदणी असलेल्या ‘घरकुल’च्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या (दि.5) व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, यात महिला लाभार्थ्यांना प्राधान्याने सहभागी करुन घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घरे या उपक्रमांतर्गत देशभरात घरकुल योजना राबविल्या जात आहेत. राज्यातील शहरी भागात महापालिका व नगरपालिकांमार्फत या योजना राबविल्या जात आहेत. यात स्वतःची जागा असलेल्यांनाही घरकुल उभारणीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जातो. या घटकांतर्गत जिल्ह्यातील श्रीरामपूर नगरपालिकेचा प्रकल्प अहवाल मंजूर झालेला आहे. त्यातील ज्या लाभार्थ्यांची एमआयएस पोर्टलवर नोंदणी झालेली आहे, अशा लाभार्थ्यांची यादी शासनाकडे सादर करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील 15 लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. महिला लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार असून या लाभार्थ्यांशी पंतप्रधान मोदी स्वतः संवाद साधणार आहेत. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार्‍या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

नगरच्या लाभार्थ्यांची संधी हुकली!

नगर महापालिकेचा 840 घरकुलांचा डीपीआरही नुकताच मंजूर झाला असून त्यातील लाभार्थ्यांची यादीही शासनाकडे सादर करण्यात आली आहे. मात्र, उद्या होणार्‍या व्हिडीओ कॉन्फरन्स चर्चा सत्रात स्वतःच्या जागेवर घरकुलासाठी अनुदान दिल्या जाणार्‍या लाभार्थ्यांची निवड करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. या घटकातील महापालिकेचा प्रकल्प अहवाल तयार नसल्याने त्यांची संधी हुकणार आहे. त्यामुळे 840 घरकुल प्रकल्पातील काही लाभार्थ्यांना पंतप्रधान मोदी यांच्याशी संवास साधण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.