Wed, Jul 17, 2019 12:15होमपेज › Ahamadnagar › पी. पी. बॅग ग्राहकांच्या हातात नको!

पी. पी. बॅग ग्राहकांच्या हातात नको!

Published On: Jun 27 2018 1:19AM | Last Updated: Jun 26 2018 11:32PMनगर : प्रतिनिधी

प्लॅस्टिक वापरावर बंदीचा निर्णय हा पर्यावरणाच्या दृष्टीने गरजेचा आहे. व्यापार्‍यांनी त्यांच्याकडे असलेला माल ग्राहकाला विकतांना मालावर पॅकिंगसाठी वापरलेला प्लॅस्टिक कागद (पी.पी.बॅग) काढून घ्यावी. पी.पी.बॅगसह मालाची मालाची विक्री करणार नाही, असे प्रतिज्ञापत्र व्यापार्‍यांनी शासनाकडे द्यावे. या संदर्भात उच्चाधिकार समितीमध्ये तांत्रिक बाबी तपासून निर्णय घेतला जाईल व व्यापार्‍यांच्या अडचणी दूर केल्या जातील, असे आश्‍वासन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

सरकारने राज्यात प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. मात्र, बाजारपेठेतील व्यापारी या निर्णयामुळे अडचणीत सापडले आहेत. सोमवारी (दि.25) मनपाच्या पथकाकडून कारवाई सुरु असताना व्यापार्‍यांनी विरोध करत पर्यावरण मंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. पर्यावरण मंत्री कदम यांनी भेटीसाठी वेळ दिल्यानंतर काल (दि.26) अनिल राठोड व महापौर सुरेखा कदम यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी व व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी मुंबईत पर्यावरण मंत्री कदम यांची भेट घेतली. 

नगर शहरात व्यापार्‍यांकडे मोठ्या प्रमाणात साठवणूक असलेल्या मालाला पी.पी.बॅगचे पॅकिंग आहे. कंपन्यांकडूनच हे पॅकिंग करुन आलेले आहे. शासनाच्या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतर या व्यापार्‍यांवरही प्लॅस्टिक बाळगल्या प्रकरणी कारवाई केली जात आहे. त्यामुळे व्यापारी अडचणीत सापडले आहेत. आम्ही या बॅग काढल्या तर आतील माल खराब होईल व ग्राहक असा माल घेणार नाहीत. आम्ही प्लॅस्टिक पिशव्या ग्राहकांना दिल्यास जरुर कारवाई करावी. मात्र, पी.पी.बॅगबाबत शासनाने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी व्यापार्‍यांनी यावेळी केली.

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी याची दखल घेतानाच व्यापार्‍यांनी त्यांच्याकडे असलेला माल ग्राहकाला विकताना मालावर पॅकिंगसाठी वापरलेला प्लॅस्टिक कागद काढून घ्यावा व तो उत्पादक कंपन्यांना परत पाठवावा, अशा सूचना दिल्या. प्लॅस्टिक पॅकिंगसह मालाची विक्री करु नये. उत्पादक कंपन्यांनी या प्लॅस्टिकचे रिसायकलिंग करावे. प्लॅस्टिक पॅकिंगसह मालाची विक्री करणार नाही, असे प्रतिज्ञा पत्र व्यापार्‍यांनी द्यावे. या संदर्भात उच्चाधिकार समितीमध्ये येत्या तीन दिवसांत तांत्रिक बाबी तपासून निर्णय घेतला जाईल व व्यापार्‍यांच्या अडचणी दूर केल्या जातील. तो पर्यंत व्यापार्‍यांवर कारवाई करु नये, अशा सूचनाही दिल्या जातील, असे आश्‍वासन पर्यावरण मंत्री कदम यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. 

यावेळी उपमहापौर अनिल बोरुडे, सभागृहनेते गणेश कवडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी सभागृह नेते अनिल शिंदे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, दत्तात्रय मुदगल आदींसह पदाधिकारी, नगरसेवक, व्यापारी असोसिएशनचे सचिव किरण व्होरा, सुशिल येवलेकर, वसंत मिसाळ आदी उपस्थित होते.