Sun, Aug 18, 2019 15:07होमपेज › Ahamadnagar › सरकार खाली खेचण्यासाठी सज्ज व्हा!

सरकार खाली खेचण्यासाठी सज्ज व्हा!

Published On: Feb 13 2018 2:05AM | Last Updated: Feb 13 2018 12:22AMअकोले : प्रतिनिधी

गेल्या तीन वर्षांत केंद्र व राज्य सरकारने सातत्याने शेतकरी विरोधी निर्णय घेतले. त्यामुळे शेतकरी व सहकार उद्ध्वस्त झाला आहे. या सरकारला खाली खेचण्यासाठी सज्ज व्हा, यासाठीच दि. 16 तारखेला अकोल्यात होत असलेल्या हल्लाबोल मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन आ. वैभवराव पिचड यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने येत्या 16 फेब्रुवारीला अकोल्यात हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त तालुक्यातील कळस, वाशेरे, सुगाव, परखतपूर, विरगाव, ढोक्री या गावांमध्ये सभा झाल्या. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मिनानाथ पांडे, तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, यशवंत आभाळे, सुधाकर देशमुख उपस्थित होते. 

आ. पिचड म्हणाले की, फसव्या भाजप-शिवसेना सरकारचा सार्वत्रिक  निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सुरु असलेली हल्लाबोल आंदोलन यात्रा  16 फेबुरवारी 2018 रोजी अकोले येथे येत असून यावेळी पक्षाचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष  आ. सुनील तटकरे, खा. सुप्रिया सुळे,  माजी मंत्री मधुकरराव पिचड, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत. आपल्या प्रमुख मागण्या सरकारच्या निदर्शनास आणून देऊन त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन केले आहे.

या मोर्चात तालुक्यातील व राज्यातील प्रश्न मांडले जाणार आहेत. यामध्ये कर्जमाफी योजनेंतर्गत राज्यातील सर्व शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा 7/12 कोरा करा. शेतकर्‍यांच्या मालाला उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा असा हमीभाव जाहीर करावा. गायीच्या दुधाला 30 प्रतिलिटर व म्हशीच्या दुधाला 50 प्रतिलिटर खरेदी दर द्यावा.  शेतकर्‍यांना मागील 3 वर्षांपासून शेततळे, ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, मचलिंंग, प्लॅस्टिक, कागद, ठिबक व तुषार संच यांचे अनुदान मिळालेले नाही ते तातडीने द्यावे. कांदा, मका, सोयाबीनची हमीभाव खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावी. निळवंडे धरणाचे मुख्य कालवे बंदिस्त पाईपलाईनमधून करण्यात यावे व उचस्तरीय कालव्याचे कामे पूर्ण करा अशा विविध मागण्या या मोर्चात करण्यात येणार आहे. तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.