Sun, Jul 05, 2020 22:34होमपेज › Ahamadnagar › राज्यात सेंद्रिय शेतीचे काम उत्कृष्ट : हजारे

राज्यात सेंद्रिय शेतीचे काम उत्कृष्ट : हजारे

Published On: May 06 2018 1:06AM | Last Updated: May 05 2018 11:11PMनगर : प्रतिनिधी

सेंद्रिय शेतीचे महत्त्व आता शेतकर्‍यांना पटू लागले आहे. शेतीमध्ये परिवर्तन करण्याची गरज ओळखून शेतकर्‍यांनी वाटचाल करणे गरजचे आहे. सेंद्रिय शेतीत परिवर्तन होण्यास थोडा वेळ लागेल. परंतु, त्यामुळे चांगले काम होईल. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीचे काम उत्कृष्ट आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

केंद्र पुरस्कृत शाश्‍वत शेती अभियानांतर्गत परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या सदस्यीय समितीने राळेगण सिद्धी येथे हजारे यांची सदिच्छा भेट घेऊन सेंद्रिय शेतीवर चर्चा केली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आरसीओएफ, भुवनेश्‍वरचे सहसंचालक डॉ. एम. के. पालीवाल, बंगलोरचे विठ्ठल देवघरे, प्रकल्प संचालक (आत्मा) भाऊसाहेब बर्‍हाटे, राज्य नोडल अधिकारी अशोक बानखेले, उपसंचालक सुरेश जगताप, कौस्तुभ कराळे, प्रगतशील शेतकरी राजेंद्र शेळके आदी उपस्थित होते.

हजारे पुढे म्हणाले की, राळेगणमध्ये झाडांचा पालापाचोळा जाळला जात नाही. त्याचे कंपोस्ट खत तयार केले जाते. संपूर्ण गावाचा कचरा एकत्र करून खत तयार केले जाते. गांडूळ खत व बी डी कंपोस्टचा विश्‍लेषण रिपोर्ट केला जातो. शाळेतील 1100 विद्यार्थ्यांचे युरिन एकत्र केले जाते. दिवसभरात सरासरी गावातून सर्व सांडपाणी व इतर मिळून 70 हजार लिटर सांडपाणी गोळा केले जाते. त्यावर प्रक्रिया करून शेतीसाठी वापरले जाते. जलयुक्त शिवारच्या सर्वांत पहिला प्रयोग 1975 मध्ये राळेगण येथे केला. जलयुक्त शिवार अंतर्गत जिल्ह्यात चांगले काम सुरू आहे. योजनेत शास्त्रशुद्ध पद्धतीने काम करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.