Sun, Nov 18, 2018 07:03होमपेज › Ahamadnagar › जुगारी गुरुजींची पगारवाढ रोखली!

जुगारी गुरुजींची पगारवाढ रोखली!

Published On: Jul 05 2018 1:36AM | Last Updated: Jul 05 2018 12:34AMनगर : प्रतिनिधी

उन्हाळ्याच्या सुट्टीत जुगार खेळत बसलेल्या सहा शिक्षकांना कर्जतमध्ये पोलिसांनी अटक केली होती. याबाबत जिल्हा परिषदेकडून चौकशी झाल्यानंतर या जुगारी गुरुजींची एक पगारवाढ रोखण्याचा आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी दिला.

जुगार्‍यांवर कारवाई 17 मे रोजी झाली होती. कर्जत शहरात शिक्षकांची एक वसाहत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीचा फायदा घेत रिकामटेकड्या बसलेल्या गुरुजींनी वसाहतीतच जुगार खेळायला सुरुवात केली. वेळ घालवण्यासाठीचा पत्त्यांचा खेळ पैसे कमवायचे साधनच बनला होता. एक्का, दुर्री, तिर्री गुल्ल्या, राणी, राजा आणि जोकरचा खेळ चांगला रंगात आलेला होता. खेळणारे सगळे प्रतिष्ठित गुरुजी होते. 

याची खबर पोलिसांना लागली. टीम सोबत घेत पोलिसांनी थेट शिक्षक वसाहत गाठली. ऐन रंगात आलेला डाव पोलिसांच्या एन्ट्रीने मोडला. जुगारी गुरुजी अलगद जाळ्यात अडकले. यात फक्त गुरुजीच नव्हे तर, मुख्याध्यापक आणि चक्क प्राथमिक शिक्षक बँकेचा एक संचालकही सापडला. त्यांच्याकडून 23 हजारांचे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले होते.

प्रकारानंतर जिल्हा परिषदेने चौकशी सुरु केली. त्याची सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर पुढील वेतनवाढीवर परिणाम होईल अशारीतीने एक पगारवाढ दोन वर्षांसाठी रोखण्याचा आदेश शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी दिल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली. जुगार खेळतांना पकडले गेल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांची बदनामी झाल्याचा आरोप झाला. आता या जुगारी शिक्षकांवर कारवाई झाल्याने शिक्षकांमध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे.