Tue, Apr 23, 2019 09:36होमपेज › Ahamadnagar › सभापतीपदी मिळणार ‘भाजप’ला संधी!

सभापतीपदी मिळणार ‘भाजप’ला संधी!

Published On: Apr 25 2018 12:55AM | Last Updated: Apr 24 2018 10:33PMनगर : प्रतिनिधी

स्थायी समितीच्या सभापती पदासाठी विभागीय आयुक्‍तांकडे काल (दि.24) दुपारी प्रस्ताव सादर झाल्यानंतर नवीन सभापती पदासाठी महापालिकेत हालचालींना वेग आला आहे. मनसेकडे असलेल्या सभापती पदावर आता भाजपला संधी मिळण्याची चिन्हे आहेत. यासाठी माजी सभापती बाबासाहेब वाकळे यांचे नाव सध्यातरी चर्चेत आघाडीवर आहे. मात्र, उपमहापौर पदाच्या संधीने हुलकावणी दिलेल्या दत्तात्रय कावरे यांच्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत.

मनसेच्या सुवर्णा जाधव या 25 जुलै 2017 पासून सभापती पदावर आहेत. सभापती पदाचा कार्यकाळ एक वर्षाचा असला तरी नवीन सदस्य निवडीमुळे नवीन सभापती पदाचा प्रस्ताव महापालिकेने विभागीय आयुक्‍तांकडे सादर केला आहे. त्यामुळे जाधव यांना 10 महिन्यांतच पद सोडण्याची वेळ येणार आहे. दुसरीकडे प्रस्ताव दाखल होताच नवीन सभापती निवडीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपकडे असलेले उपमहापौर पद शिवसेनेला मिळाल्यामुळे यंदा सभापती पदावर भाजपला संधी देण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. मागील सभापती निवडणुकीवेळी झालेल्या तडजोडीत जाधव यांना संधी दिल्यानंतर वाकळे यांना अखेरच्या टप्प्यात संधी देण्याचा शब्द शिवसेनेने दिला होता. तसेच वाकळे यांनी या पदासाठी गेल्या काही दिवसांपासून हालचालीही सुरु केल्या आहेत. समितीतील सदस्यांच्या भेटी गाठींसह शिवसेना-भाजप नेत्यांशीही त्यांनी चर्चा केली आहे. मात्र, उपमहापौर पदाची आलेली संधी सोडणार्‍या दत्तात्रय कावरे यांना सभापती पदावर बसविण्यासाठी काहींनी प्रयत्न सुरु केले आहेत. कावरे यांचेच नाव या पदासाठी निश्‍चित होते, असेही सांगितले जात आहे.

सभापती पदासाठी वाकळे व कावरे या दोघांनीच अंतर्गत चर्चा करुन निर्णय घ्यावा, अशी भूमिका सध्या तरी शिवसेनेने घेतली आहे. भाजप नेते अभय आगरकर यांचे मतही यात महत्वाचे ठरणार असल्याने ते कावरे यांच्या ऐवजी वाकळेंच्या नावाला सहमती देणार का? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज नगर दौर्‍यावर असून त्यांच्या दौर्‍यानंतर सभापती पदाचा उमेदवार निश्‍चित होणार असल्याचे सांगण्यात आले.

Tags : Ahmadnagar, Opportunity,  BJP,  elected, Chairman