पिंपळगाव माळवी : वार्ताहर
नागापूर एमआयडीसीसाठी अतिरिक्त भूसंपादनासंदर्भात पिंपळगाव माळवी, वडगाव गुप्ता येथील बाधित शेतकर्यांसमवेत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांच्या समवेत एमआयडीसीतील सिद्धी लॉन येथे शेतकर्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी बैठक झाली. या बैठकीमध्ये उपस्थित शेतकर्यांनी अतिरिक्त भूसंपादनास कडाडून विरोध केला.
नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी, वडगाव गुप्ता या परिसरातील 461 हेक्टर क्षेत्रावर नागापूर एमआयडीसीसाठी अतिरिक्त भूसंपादनासंदर्भात 2011 साली महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने शेतकर्यांच्या सातबारा उतार्यावर अतिरिक्त अधिकारांत नाव लावण्यात आले होते. या संदर्भात संबंधित शेतकर्यांसमवेत चर्चा करण्याबद्दल मागील आठवड्यात शेतकर्यांना नोटीस देण्यात आली होती. या नोटिसीत मूल्यांकनाचा विषय, संमतीपत्र यासंदर्भात चर्चा होणे अपेक्षित होते.परंतु शेतकर्यांच्या विरोधामुळे या विषयावर कुठलीच चर्चा झाली नाही. उपस्थित अधिकार्यांनी फक्त शेतकर्यांची भूमिका जाणून घेतली.
एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील म्हणाल्या की, पिंपळगाव माळवी, वडगाव गुप्ता येथील 461 हेक्टर क्षेत्रासंदर्भात शासनाने 2011 साली अधिसूचना जारी केली होती. या भूसंपादनात शेतकर्यांना 15 टक्के औद्योगिक व 5 टक्के व्यावसायिक जमीन आरक्षित ठेवण्यात येणार आहे.
परंतु उपस्थित शेतकर्यांनी कुठल्याही परिस्थितीत जमिनी एमआयडीसीसाठी देण्यास पूर्णपणे विरोध दर्शविला. शेती बचाव कृती समितीच्या अध्यक्ष प्रकाश डोंगरे यांनी सांगितले की, सन 2011 पासून पिंपळगाव व वडगावच्या शेतकर्यांनी या भूसंपादनास विरोध दर्शविला आहे. पिंपळगाव माळवी, वडगाव गुप्ता ग्रामसभेचा ठराव देखील शासनाला पाठविला आहे. यावेळी शेतकर्यांच्या वतीने आबा सातपुते, भीमा गुंड, जालिंदर गुंड, रमेश देवकर, प्रभाकर शेवाळे, गोरख ढेरे, पं. स. सदस्य गुलाब शिंदे, माजी सैनिक रामभाऊ शेवाळे, बापू बेरड, गोरख कराळे यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
भावना जाणून घेण्याचा उद्देश : द्विवेदी
आम्ही शेतकर्यांच्या भूमिका जाणून घेतल्या आहेत. अहवाल तयार करून या आठवड्यात शासनाला पाठविणार असून अंतिम निर्णय शासन पातळीवरच होईल. शेतकर्यांचा विरोध कुठल्या कारणासाठी आहे हे जाणून घेणे हा या बैठकीमागचा उद्देश होता, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.
शासनाने भूमिहीन करू नये : शेवाळे
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना वयोवृद्ध माजी सैनिक रामभाऊ शेवाळे यांच्या डोळ्यांत अश्रू आले. आम्ही देशासाठी आमचे आयुष्य वाहून घेतले. शासनाने आम्हाला भूमिहीन करू नये, हिच कळकळीची विनंती आहे. या बाधित शेतकर्यांमध्ये पिंपळगाव, वडगावच्या 40 आजी-माजी सैनिकांची शेती जात आहे.