Wed, Jul 17, 2019 18:02होमपेज › Ahamadnagar › आभाळाच्या छताखाली शिक्षणाचे धडे

आठवीचा वर्ग बंद केल्याने ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप; तीन दिवसांपासून शाळा उघड्यावर

Published On: Jul 06 2018 1:30AM | Last Updated: Jul 05 2018 11:10PMबेलपिंपळगाव : वार्ताहर

नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथील असणारी आयएओ नामांकन प्राप्त झेडपीची शाळेला गेल्या 3 दिवसांपासून कुलूप लावण्यात आले आहे. त्यामुळे इयत्ता पहिली ते सातवीचे 274 विद्यार्थी व आठवीतील 35 विद्यार्थी श्री हनुमान मंदिर परिसरात आभाळाच्या छताखाली शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. 

गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत असणारा आठवीचा वर्ग या शैक्षणिक वर्षापासून बंद करण्याचे शिक्षण विभागाकडून आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा बोलावून याबाबत नाराजी व्यक्त केली, तसेच आठवीच्या वर्गाला जो पर्यंत परवानगी देण्यात येणार नाही, तो पर्यंत शाळेला कुलूप लावण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून शाळेला ग्रामस्थांनी कुलूप लावले आहे. 

शाळेला कुलूप लावल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची हेळसांड होत आहे. त्यामुळे हे विद्यार्थी आता गावातील मंदिर परिसरात शिक्षण घेत आहेत. शाळेला कुलूप लावल्यामुळं विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार हा देखील उघड्यावर तयार करावा लागत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. 

गेल्या तीन दिवसांपासून उघड्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पहिल्या दिवशी आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी भेट दिली व लवकरच गावातील या शाळेत आठवीचा वर्ग पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्‍वासन दिले. दुसर्‍या दिवशी विस्तार अधिकार्‍यांनी देखील येथे भेट देऊन माहिती घेतली व लवकरच निर्णय घेतले जाईल, असे सांगितले.  मात्र जि. प. सदस्य यांनी इकडे दुर्लक्ष केल्याने गावात नाराजीचा सूर आहे. 

शाळेचे मुख्याध्यापक बी. एच. काशीद म्हणाले, गावातील ग्रामस्थांनी शाळेला कुलूप लावल्यामुळं विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी आम्ही शाळा गावातील मंदिराच्या परिसरात भरवत आहोत. विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षण देत आहे व वरिष्ठ अधिकारी यांनी इयत्ता आठवीचा वर्ग बंद करण्याचा आदेश दिला. त्यामुळे ग्रामस्थांनी शाळेला कुलूप लावले.
दरम्यान, प्रशासनाने तात्काळ आठवीचा वर्ग पूर्ववत करावा, अशी मागणी पालकांमधून केली जात आहे.