Wed, May 22, 2019 22:46होमपेज › Ahamadnagar › ३७० किलो टोमॅटो विकून हाती आला फक्त एक रुपया!

३७० किलो टोमॅटो विकून हाती आला एक रुपया!

Published On: Sep 07 2018 1:04AM | Last Updated: Sep 07 2018 1:19AMसासवड : प्रतिनिधी

येथील संतोष जगताप या शेतकर्‍याला 17 क्रेट म्हणजे तब्बल 370 किलो टोमॅटो विकल्यानंतर खर्च वजा जाता फक्त एक 1 रुपया हातात पडला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी गुरुवारी सासवड येथे सुरु असलेल्या सकल मराठा समाज आंदोलनात रस्त्यावर टोमॅटो ओतून शासनाचा निषेध केला. 

ही म्हणजे अहोरात्र घाम गाळून तुमच्या-आमच्या तोंडात घास भरविणार्‍या बळीराजाची अतिशय क्रूर थट्टाच झाली. एकीकडे हमीभाव, शेतकरी हिताच्या योजना याचा डांगोरा पिटला जात असताना वास्तव मात्र भीषण आहे. माल विकून शेतकर्‍याकडे गावी परतण्याइतकेही भाडे हाती उरले नाही. गेल्या तीन वर्षांपासून शेतमालाचे बाजारभाव मोठ्या प्रमाणावर गडगडले आहेत. शेती व्यवसाय पूर्णपणे तोट्यात चालला आहे. हमीभावासाठी अनेक आंदोलने, मोर्चे झाले, बंद पाळण्यात आले. मात्र, शासन दखल घेत नाही. लाखांना जगविणारा पोशिंदा जगेल तरी कसा? आम्ही काळ्या आईची सेवा करायची की नाही? असा संतप्त सवाल सासवडच्या शेतकर्‍यांनी ’टमाटे फेको’ आंदोलनात केले. आमच्या सहनशीलतेचा अधिक अंत पाहू नका, असा इशाराही त्यांनी दिला.  

जगताप यांनी चांगला भाव मिळण्याच्या आशेवर 17 क्रेट टोमॅटो मुंबईत विक्रीसाठी पाठवले होते. एक क्रेट म्हणजे साधारणतः 20 ते 22 किलो असते. 17 डागांचे वजन 404 किलो इतके भरले. त्यातून क्रेटचे व इतर वजन 36 किलो वजावट धरली. निव्वळ टोमॅटो मालाचे वजन 370 किलो धरले गेले. प्रतिकिलो 3 रुपये 60 पैसे दराने त्यापोटी अवघी 1,332 रुपये विक्री रक्कम झाली. त्यातून हमाली, तोलाई, टपाल व बारदानखर्च, गाडीभाडे असा एकूण खर्च 1,331 रुपये इतका झाला. हे सारे खर्च वजा जाता फक्त 1 रुपया जगताप यांच्या हातावर टेकवण्यात आला.

फक्त मालाच्या विक्रीपोटी केलेला माझा खर्चही भरून निघालेला नाही. शेतीची मशागत, टोमॅटो रोप लागवडीपासून पाणी घालणे, खते, औषध फवारणी, बांधणी, मजुरी आदी उत्पादन खर्च तर गृहीतच धरलेला नाही. 50 हजार रुपये मी खर्च केले. त्यात पहिल्या दोन तोड्यात किरकोळ माल आला. हा तिसरा व महत्त्वाचा तोडा मातीमोलच झाला. जर शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसेल तर आम्ही शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय? आमच्यासमोर सरकारने दुसरा काही पर्याय ठेवलाय का? त्यामुळेच शेतकरी जागविण्यासाठी शासनाने शेतमालाला हमीभाव देणे अत्यंत गरजेचे आहे.          -संतोष जगताप, टोमॅटो उत्पादक शेतकरी, सासवड