Wed, Apr 24, 2019 19:32होमपेज › Ahamadnagar › उद्दिष्ट पूर्णतेसाठी धावपळ

उद्दिष्ट पूर्णतेसाठी धावपळ

Published On: Mar 15 2018 1:17AM | Last Updated: Mar 15 2018 12:21AMनगर : प्रतिनिधी

गेल्या अकरा महिन्यात महसूल अधिकारी व कर्मचार्‍यांकडून फक्‍त 46 टक्के वसुलीची नोंद झाली. वसुलीचे प्रमाण अत्यल्प असल्याने जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी महसूल अधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी केली. शेवटच्या महिन्यात 77 कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट महसूल यंत्रणेपुढे  उभे टाकले आहे. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांची धावपळ सुरु आहे.

2016-17 या गेल्या वर्षी शासनाने 141 कोटी 75 लाख रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते.जिल्हाभरातील महसूल अधिकारी व कर्मचार्‍यांनी हे टार्गेट सहजरित्या पूर्ण केले. 2017-18 या आर्थिक वर्षासाठी शासनाने 142 कोटी रुपयांचे टार्गेट दिले. गेल्या वर्षांपर्यंत करमणूक करापोटी 10 ते 12 कोटी रुपयांचा महसूल उपलब्ध होत होता. यंदा मात्र करमणूक विभागच विक्रीकर विभागाकडे वर्ग झाला आहे. त्यामुळे यंदापासून जमीन महसूल व गौण खनिज हे दोन हेडपासूनच 142 कोटी रुपयांचा महसूल गोळा करावा लागत आहे.

महसूल विभागाची महसूल वसुली नेहमीच संथ गतीने सुरु असते. शेवटच्या चार महिन्यात वसुलीला वेग येतो. परंतु यंदाच्या आर्थिक वर्षात ही वसुली अधिकच संथ गतीने सुरु असल्याचे पुढे आले आहे. यंदा 142 कोटीमध्ये जमीन महसूलच्या माध्यमातून 50 कोटी तर गौण खनिज माध्यमातून 92 कोटी महसूल वसूल करावयाचा आहे. गेल्या 11 महिन्यांत मात्र जमीन महसूलचा 29 कोटी 77 लाख 8 हजार रुपये तर गौण खनिजातून 35 कोटी 79 लाख 73 हजार रुपये अशी एकूण 65 कोटी 56 लाख 81 हजार रुपयांची वसुली झाली आहे. एकूण टार्गेटच्या तुलनेत ही वसुली फक्‍त 46 टक्के इतकी आहे. 

आतापर्यंतच्या इतिहासात सर्वांत कमी वसुलीची नोंद झाली आहे. महसूल अधिकारी मासिक आढावा बैठक नुकतीच झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी वसुलीबाबत खंत व्यक्‍त केली. कोणत्याही परिस्थितीत वसुलीचा आकडा वाढवा, अशी सक्‍त ताकीदच त्यांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकार्‍यांना दिली आहे. 

तालुकानिहाय वसुलीची टक्केवारी 

अकोले 34.45, संगमनेर 33, कोपरगाव 47.75, राहाता 75.68, श्रीरामपूर 23.52, राहुरी 27.70, नेवासा 35.35, नगर 72.54, पाथर्डी 43.15, शेवगाव 15.62, पारनेर 41, श्रीगोंदा 67, कर्जत 50, जामखेड 64.