Sat, Mar 23, 2019 12:02होमपेज › Ahamadnagar › शिष्यवृत्ती ‘ऑनलाईन’च्या कचाट्यात!

शिष्यवृत्ती ‘ऑनलाईन’च्या कचाट्यात!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : केदार भोपे

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेतील ऑनलाईन-ऑफलाईनचा घोळ अजूनही मिटलेला नाही. ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जांना पुन्हा ऑनलाईन पद्धतीनेच मंजुरी देण्याचा आदेश शासनाने दिल्याने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ऑनलाईनच्या कचाट्यात सापडली आहे. एकट्या नगर जिल्ह्यातीलच 30 हजार विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला ऑनलाईन मंजुरी नसल्याने विद्यार्थ्यांसह महाविद्यालयेही अडचणीत आली असून, यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

एकीकडे राज्य व केंद्र सरकारवर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या बंद करत असल्याचा आरोप होत असतांना, ज्या शिष्यवृत्त्या सुरु आहेत त्या देण्यासही प्रशासकीय तांत्रिक दिरंगाईने उशीर होत आहे. बारावीच्या पुढे शिक्षण घेत असलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना सुरुवातीस ऑनलाईन पद्धतीने शासनाच्या ‘महाईस्कोल’ या पोर्टलवर अर्ज भरण्यास सांगितले होते.

विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली असता ह्या ऑनलाईन पोर्टलचे सर्व्हरच ‘डाऊन’ झाले. त्यावर विद्यार्थी संघटना तसेच शिक्षक व पालकांनी आवाज उठविल्यानंतर ऑफलाईन पद्धतीने अर्ज  घेण्यास शासनाने परवानगी दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी हाताने अर्ज भरून महाविद्यालयात दिले. महाविद्यालयांनी हे अर्ज एकत्रित करून समाजकल्याण विभागाकडे सुपूर्त केले. 

25 मार्चच्या दरम्यान शासनाने फर्मान काढून ऑफलाईन अर्ज भरलेल्या द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या अर्जांना ऑनलाईन पद्धतीनेच मंजुरी देण्याचा आदेश महाविद्यालयांना दिला. महाविद्यालयांनी ऑनलाईन पद्धतीने मंजुरी देण्याचा प्रयत्न केला असता, पोर्टलचे ‘सर्व्हर डाऊन’ झाल्याने 30 हजार विद्यार्थ्यांच्या अर्जांना अजूनही मंजुरी मिळालेली नाही. 31 मार्च रोजी ऑनलाईन मंजुरी देण्याची ‘लिंक’ बंद झाली आहे. पोर्टल कधी सुरु होईल याचीही माहिती नसल्याने विद्यार्थी व महाविद्यालयांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. 

ऑनलाईन मंजुरी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व परीक्षा शुल्काची रक्कम ही त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. त्यानंतर यातील महाविद्यालयांचा ‘वाटा’ हा सात दिवसांच्या आत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांकडे जमा करावा लागेल. सध्या विद्यापीठाच्या परीक्षांचा कालावधी सुरु आहे. परीक्षा संपण्याच्या पूर्वीच विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा न झाल्यास महाविद्यालयांच्या आर्थिक अडचणीत वाढ होणार आहे. परिक्षेनंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी असणार आहे. सुट्ट्या सुरु झाल्यास महाविद्यालयांना त्यांचा ‘वाटा’ हा दोन ते तीन महिने उशिरा मिळणार असल्याने विद्यार्थी व महाविद्यालयांची डोकेदुखी वाढणार आहे.

लवकरच तोडगा निघेल

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने मंजुरी देण्याचे शासनाने कळविले. याबाबत महाविद्यालयांना ऑनलाईन मंजुरी देण्यात सर्व्हरचा अडथळा निर्माण झाल्याच्या तक्रारी आल्या. द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची ही समस्या असून शासनाकडून यावर लवकरच तोडगा काढला जाईल.    - पांडुरंग वाबळे, सहायक आयुक्त, समाजकल्याण
 


  •