Thu, Jan 17, 2019 13:18होमपेज › Ahamadnagar › ऑनलाईन भरावे लागणार अर्ज

ऑनलाईन भरावे लागणार अर्ज

Published On: Feb 05 2018 1:59AM | Last Updated: Feb 04 2018 10:53PMनगर :  प्रतिनिधी

जिल्ह्यातील 128 ग्रामपंचायतींमधील सदस्यपदांच्या 192 रिक्‍त जागांसाठी 25 फेब्रुवारीला पोटनिवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ऑफलाईन नव्हे तर ऑनलाईन स्वीकारले जावेत, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. माहे मार्च ते मे 2018 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच विविध ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्यपदांच्या रिक्‍त जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम आयोगाने 22 जानेवारी 2018 रोजी जाहीर केला. 16 ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ऑनलाईन तर पोटनिवडणुकीसाठी ऑफलाईन स्वीकारले जावेत, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते.

आयोगाने 2 फेब्रुवारी 2018  रोजी निवडूक कार्यक्रमात थोडा बदल केला आहे. सरपंच व सदस्यांच्या पोटनिवडणुकीसाठी देखील उमेदवारी अर्ज ऑनलाईनच स्वीकारले जावेत, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथील सरपंचपदासाठी होणार्‍या पोटनिवडणुकीतील इच्छुक उमेदवारांना आता ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. जिल्हाभरातील 16 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि 128 ग्रामपंचायतींच्या रिक्‍त 192 जागांसाठी सोमवारपासून (दि.5) उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 10 फेब्रुवारीपर्यंत आहे. 12 फेब्रुवारीला छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज 15 फेब्रुवारीपर्यंत मागे घेता येणार आहे.