होमपेज › Ahamadnagar › कांदा दर घसरणीने शेतकर्‍यांचा वांदा

कांदा दर घसरणीने शेतकर्‍यांचा वांदा

Published On: May 07 2018 2:00AM | Last Updated: May 07 2018 12:31AMकर्जत : प्रतिनिधी

दुधाचे भाव पडलेले, उसाच्या दराचा वांदा झालेला आणि कांद्याचे वाढलेले उत्पादन व कमी झालेल्या भावामुळे कर्जत तालुक्यातील बळीराजा चांगलाच हवालदिल झाला आहे. काही शेतकरी अडचणींमुळे मिळेल त्या भावाने किंवा कवडीमोल भावाने कांदा विकत आहेत. काही शेतकर्‍यांची कमी भावाने विकण्यापेक्षा भविष्यात चांगला भाव मिळेल या अपेक्षेने कांद्याची साठवण करण्यासाठी लगबग सध्या सुरू आहे.

कर्जत तालुक्यातील आंबिजळगाव व पंचक्रोषितील गावे कांद्याचे आगर म्हणून राज्यात ओळखले जातात. आंबिजळगाव, कुळधरण, राक्षसवाडी, रूईगव्हण, आळसुंदे, खातगाव, शेगुड, माळंगी, लोणी मसदपूर, चिलवडी, चापडगाव, कोरेगाव, बेनवडी, थेरवडी,  राशीन व मिरजगाव या गावांत प्रामुख्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणावर पीक घेतले जाते. या वर्षी कर्जत तालुक्यातील पाच हजार हेक्टर क्षेत्रावर कांद्याची विक्रमी लागवड झाली आहे. बारा महिने कांद्याचे पीक तालुक्यात घेतले जाते. सध्या कांदा काढणीचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे मजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. यावेळी कर्जत तालुक्यात कांद्याचे अपेक्षेपेक्षा जादा उत्पादन मिळाले आहे. 

कांद्याचा दर कोसळल्याने शेतकरी संकटात 

कांद्याला सुरवातील चांगला भाव होता. मात्र सध्या दर घसरला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बाजारभावाची हिच अवस्था आहे. सध्या व्यापारी शेतकर्‍यांकडून पाच ते सात रुपयांपर्यंत कांदा खरेदी करीत आहेत. मात्र या दराने कांदे विकण्यास शेतकरी तयार नाहीत. लागवड, खुरपणी, औषधे, मजुरांवर होणारा खर्च व शेतकर्‍यांची मेहनत हे सर्व मिळून उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. कांद्याला कमीत कमी 12 ते 15 रूपये भाव मिळाला पाहिजे.  मोठे कष्ट व खर्च करून काढलेले पीक कवडीमोल भावाने विक्री करण्यापेक्षा त्याची साठवण करण्यासाठी सध्या शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे. कर्जत तालुक्यात  कृषी विभागाने एक हजारपेक्षा जास्त कांदा चाळी शेतकर्‍यांना दिल्या आहेत. या कांदा चाळी सर्वत्र भरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या जुन्या प्रकारच्या वखारी करून त्यामध्ये कांदा साठविला जात आहे. 

पाणीदार तालुका 

गेल्या वर्षी कर्जत तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला होता. तसेच पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील 55 गावांत शासनाने जलयुक्त शिवार योजनेची कामे केली. त्यामुळे तालुक्यात पाण्याची पातळी वाढली आहे. शिवाय 1 हजार 547 शेततळी भरली आहेत. त्यामुळे पाणी वाढले आहे.म्हणून शेतकर्‍यांनी कांद्याची लागवड केली. या दिवसात अवकाळी पाऊस पडतो. त्यामुळे कांदा भिजू नये, याची  दक्षता शेतकरी घेत आहेत.  भविष्यात भाव मिळेल या अपेक्षेने हा खटाटोप सुरू आहे.